

पूर्णा: तालूक्यातील देगाव (तेल्याचे) येथील शेतकरी व मोलमजुरी करणार्या नागरिकांना विश्वासात घेऊन एका युवकाने फसवणूक केली आहे. त्याने भिशी चालवण्याच्या नावाखाली रोख स्वरुपात आणि फोन पेवर आँनलाईन पध्दतीने हप्त्याची रक्कम घेतली होती. हा पूर्णा शहरातील पवार महाविद्यालय भागात वास्तव्यास होता त्याने देगाव येथे कपडे विकण्याचे दुकान चालवून विश्वास संपादन केला. ओळखीची सलगी करत भिशी चालवण्याचा गोरखधंदा सुरु करुन त्या माध्यमातून वेगवेगळे ग्रुप तयार करुन सुमारे १ कोटी रुपयापेक्षाही अधिक रुपये गोळा केली. व परतावा न देताच संबधित युवक फरार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा तालूक्यातील देगाव (तेल्याचे)या गावात पूर्णा शहरातील एक युवक वडिलोपार्जित कपडे विकण्याचे फिरते दुकान चालवून कापड विक्री करत होता. असे काही चालत असताना त्याची ओळख गावातील बहुतांश शेतकरी, मोलमजुरी करणारे व्यक्ती व महिला यांच्याशी झाली होती. कपड्याचा व्यवहार ओळखीमुळे कधी नगदी तर एखादेवेळी उधारीवरही देत असे त्यामुळे सदर युवकाने नागरिकांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने काही महिन्यात ओळखीच्या व्यक्तींचे वेगवेगळे ग्रुप तयार करुन भिशीचा व्यवसाय चालू केला. ५ हजारापासून ५० हजार रुपायापर्यंतचा भिशीचा हप्ता रोख तर कोणाकडून फोनपेवर हप्ता रक्कम वर्ग करुन घेत असे.
सुरुवातीला काही महिने हा व्यवसाय तो विश्वासाने चालवत होता. परंतू, मागील काही महिन्यात त्याने १ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करुन घेतली आणि परतावा दिलाच नाही. यानंतर गुंतवणूक करणा-या पुरुष व महिलांनी त्या युवकाच्या पूर्णा येथील घरी चकरा मारुन दिलेले पैसे वापस देण्याची मागणी केली. असता त्याने राहते घर किंवा अन्य मालमत्ता विकून देतो असे सांगून सबंधीत गुंतवणूकदारांची बनवाबनवी करुन वेळ निभावून नेली. पण आता संबधित यूवक रक्कम घेऊन घर सोडून फरार झाला असल्याची माहिती देगाव येथील सबंधित गुंतवणूकदार शेतकरी गंगाधर ईंगोले, बाबूराव पटवे, श्याम वळसे यांनी दै पुढारीशी बोलताना सांगितले असून या प्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे बोलून दाखवले. दरम्यान, या फसवणूक प्रकारामुळे देगावात एकच खळबळ उडाली आहे.