पाथरी नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार आता चुरशीला आला असतानाच शुक्रवारी उशिरा रात्री घडलेल्या दगडफेकीच्या प्रकारामुळे शहरात मोठी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. रात्री सुमारे पावणे अकरा वाजता हा प्रकार घडला असून दोन्ही राजकीय गटांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. दगडफेकीत एकूण 22 जण जखमी झाल्याचं प्राथमिक माहितीवरून समजत आहे. या घटनेनंतर पाथरी आणि परभणी जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखी तापले असून दोन्ही गटांनी एकमेकांवर गंभीर आरोप करत पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पाथरीत निवडणूक प्रचार जोरात सुरू असताना अचानक काही अनोळखी व्यक्तींनी दगडफेक केली. या घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला. दुकाने, घरे आणि रस्त्यावरून जाणाऱ्या कार्यकर्त्यांवर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप आहे.
या दगडफेकीत अनेक जण जखमी झाले असून त्यांना तातडीने पाथरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं. काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार बाबाजानी दुराणी यांनी गंभीर आरोप करत सांगितलं की “ही दगडफेक शिवसेनेच्या अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी घडवून आणली. हा हल्ला पूर्णपणे नियोजित होता.”
तसेच दुराणी यांनी असा दावा केला की,
“घटनेनंतर परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना आम्ही मदतीसाठी संपर्क केला आणि त्यांनी आम्हाला तीन वेळा फोन करून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला.”
दुसऱ्या बाजूला सईद खान यांनी दुराणी यांच्या आरोपांचे खंडण करत उलट काँग्रेसवरच गंभीर आरोप केला. सईद खान म्हणाले
“बाबाजानी दुराणी यांनी दोनशेच्या वर गावातील गुंडांना एकत्र करून आमच्या घरावर हल्ला केला. एवढंच नाही तर शिवसेना भवनवरही हल्ला करण्यात आला.”
त्यांच्या म्हणण्यानुसार, हा प्रकार पूर्णपणे काँग्रेसकडून उचकावल्यामुळे झाला असून संपूर्ण कुटुंब भयभीत झाल्याचे त्यांनी सांगितले.
मेहराज खान यांच्या फिर्यादीवरून काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुराणी यांचे पुत्र आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जुनेद खान दुराणी यांच्यासह ८० ते ९० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. पुढील तपास पाथरी पोलीस करत आहेत.
या दगडफेक प्रकरणामुळे पाथरी नगरपरिषद निवडणुकीची हवा आणखी तापली आहे. दोन्ही गट जोरदार प्रचार करत असतानाच झालेल्या या घटनेमुळे मतदारांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाने शहरात बंदोबस्त वाढवला असून पुढील कोणताही अप्रिय प्रकार घडू नये म्हणून अतिरिक्त कर्मचार्यांची नेमणूक केली आहे.