चारठाणा : चारठाणा गावात सोमवारी (२८ जुलै) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एक नीलगाय शेतातून गावात आली. गावात येताच चार-पाच कुत्र्यांनी तिचा पाठलाग सुरू केला. घाबरलेल्या नीलगायीने थेट जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात धाव घेतली, मात्र कुत्र्यांचा टोळका तिच्या मागेच राहिला. त्यानंतर नीलगाय हुतात्मा स्मारक, दर्गा परिसर आणि शेवटी पठाण गल्लीमध्ये विनायत पठाण यांच्या घरात घुसली. घरात शिरून तिने कुत्र्यांपासून आपला जीव वाचवला.
गावकऱ्यांनी तत्काळ घराचे दार बंद करून नीलगायला सुरक्षित केले. कुत्र्यांच्या हल्ल्यात नीलगायच्या मांडीवर आणि इतर दोन-तीन ठिकाणी जखमा झाल्या. त्यामुळे ती थकली व दमछाक झाली होती. गावकऱ्यांनी नीलगायला दोरीने बांधून ठेवले आणि लगेचच पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधला.
पशुधन विकास अधिकारी डॉ. इरफान दानिश, सहाय्यक अधिकारी उमेश लखारे, विठ्ठल सोनू, वने अनस फारुकी, आकाश काकडे आदींनी घटनास्थळी येऊन नीलगायवर प्राथमिक उपचार केले. नीलगाय गावात आल्याची माहिती मिळताच वन विभागाचे वनपाल विठ्ठल बुचाले यांनी वनरक्षक अंकुश जाधव, वनमजूर पांडू जाधव व शेळके यांना घटनास्थळी पाठवले.
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नीलगायला पिकअप वाहनात टाकून पिपरी गोंडगे शिवारात सुरक्षित सोडले. गावकऱ्यांच्या तत्परतेमुळे नीलगायचा जीव वाचला.गेल्या काही काळात वन्य प्राणी – नीलगाय, हरिण, काळवीट, रानडुक्कर – मोठ्या प्रमाणावर शेतात आणि आता गावातही येऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याने गावकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.