Parbhani News : समृध्दीच्या जडवाहतुकीने पांगरा पूर्णा रस्ता बनला मृत्यूचा सापळा file photo
परभणी

Parbhani News : समृध्दीच्या जडवाहतुकीने पांगरा पूर्णा रस्ता बनला मृत्यूचा सापळा

निकृष्ट दर्जाचे काम, दोन्ही कंत्राटदारांचा हलगर्जीपणा; वाहनचालकांचा जीव धोक्यात, पावसात चिखलाचे साम्राज्य

पुढारी वृत्तसेवा

Parbhani News : Pangra Purna Road has become a death trap due to heavy traffic of samruddhi

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पांगरा ते पूर्णा या सुमारे ६ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, पावसाळ्यात हा रस्ता अक्षरशः चिखलाच्या दलदलीत बदलला आहे.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या मजबुतीकरणा कामात निकृष्ट दर्जाचा मुरूम वापरल्याचा आरोप होत असतानाच, जालना-नांदेड समृद्धी महामार्गाच्या कामासाठी सुरू असलेल्या जडवाहतुकीमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली. परिणामी, दुचाकीस्वार घसरून अपघात होत असून चारचाकी वाहनेही रुतून बसत आहेत. नागरिकांच्या मते हा रस्ता आता मृत्यूचा सापळा ठरला आहे.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून पूर्णा ते हिवरा या सुमारे १२ किलोमीटर रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. कामाच्या सुरुवातीलाच कंत्राटदाराने मातीमिश्रित व चुनखडीयुक्त निकृष्ट मुरूम टाकून दोन थरांचे मजबुतीकरण केले. मात्र, पावसाचा पहिलाच जोरदार मारा होताच हा मुरूम चिखलात बदलला. त्यामुळे संपूर्ण रस्ता निसरडा झाला असून वाहनांची वाहतूक वारंवार ठप्प होत आहे.

विशेषतः शेतकरी, विद्यार्थी, रुग्णवाहिका आणि ग्रामीण नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच काळात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत उभारण्यात येत असलेल्या जालना-नांदेड समृद्धी महामार्गासाठी याच रस्त्यावरून हायवा व जड टिपरद्वारे गौण खनिजाची वाहतूक सुरू झाली. दिवस-रात्र सुरू असलेल्या या जडवाहतुकीमुळे आधीच कमकुवत झालेला रस्ता पूर्णपणे उखडला.

रस्त्यावर खोल खड्डे, चिखल आणि निसरडेपणा निर्माण झाल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून जखमी झाले. समृद्धी महामार्गाच्या जडवाहतुकीमुळे रस्ता खराब झाल्याचे कारण देत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कंत्राटदाराने कामही बंद केले. त्यामुळे रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेतच राहिले. या प्रश्नावर संतप्त पांगरा येथील सामाजिक कार्यकर्ते बाबाराव ढोणे यांनी आमरण उपोषण केले होते. त्यांच्या आंदोलनानंतर ४ फेब्रुवारीला तहसील कार्यालयात एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता वाघ, तत्कालीन तहसीलदार प्रशांत थारकर आणि उपोषणकर्ते यांच्यात बैठक झाली. बैठकीत पूर्णा ते पांगरा या मार्गावर समृद्धी महामार्गाच्या वाहनांची वाहतूक सुरू असल्याने त्या भागातील रस्त्याची जबाबदारी एमएसआरडीसीच्या कंत्राटदाराने घ्यावी, खराब रस्त्यावर कठीण मुरूम टाकून वाहतूक सुरळीत ठेवावी, तसेच पांगरा ते हिवरा या उर्वरित मार्गाचे काम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कंत्राटदाराने तातडीने पूर्ण करावे, असा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र, बैठकीतील निर्णय केवळ कागदावरच राहिले. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कंत्राटदाराने पांगरा हिवरा रस्त्याचे काम पूर्ण केले नाही, तर समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदारानेही खराब रस्त्यावर कठीण मुरूम टाकण्याचे आश्वासन पाळले नाही. परिणामी दोन्ही यंत्रणांच्या निष्काळजीपणाचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांनी समृद्धी महामार्गाच्या कार्यकारी अभियंत्यांना अनेकदा पत्रव्यवहार करून रस्ता दुरुस्तीची मागणी केली. मात्र, त्या पत्रांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे हा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. विशेष म्हणजे, या प्रश्नाबाबत खा. संजय जाधव यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याची चर्चा आहे. मात्र, त्यानंतरही प्रत्यक्षात कोणतीही उपाययोजना केली नाही.

सध्या प्रत्येक पावसानंतर पांगरा पूर्णा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असून शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि रुग्णांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. मोठी जीवितहानी होण्यापूर्वी निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, समृद्धी महामार्गाच्या जडवाहतुकीस पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा आणि रस्त्याची तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT