परभणी : वडिलांच्या निधनानंतर भावासोबत केलेल्या वाटणीपत्रानुसार शेतजमिनीचा फेरफार करण्यासाठी तब्बल २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. गंगाखेड तालुक्यातील पडेगाव सज्जाचे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
विशेष म्हणजे, एसीबीने सापळा कारवाईची तयारी केली असताना तलाठ्याला संशय आल्याने त्याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष लाच स्वीकारण्याची कारवाई होऊ शकली नसली तरी तक्रारीच्या पडताळणी दरम्यान पंचांसमक्ष लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल केला आहे. ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) रमेश त्र्यंबकराव लटपटे (वय ४८) असे एसीबीने पकडलेल्या तलाठ्याचे नाव आहे. तक्रारदार ७० वर्षीय शेतकरी असून त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांनी व त्यांच्या भावाने वाटणीपत्र तयार करून घेतले होते.
या वाटणीपत्रानुसार शेतजमिनीचा फेरफार करून नोंद घेण्यासाठी तक्रारदाराने ९ जुलै रोजी जुन्या तहसील कार्यालयात तलाठी रमेश लटपटे यांची भेट घेतली होती. त्यावेळी वाटणीपत्रानुसार फेरफार नोंद घेण्यासाठी तलाठ्याने तक्रारदाराकडे तब्बल २५ हजार रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद केले. तक्रारदाराने आपल्याकडे केवळ ५ हजार रुपये असल्याचे सांगितले. त्यानंतर तलाठ्याने तहसील कार्यालयात अर्ज दाखल करून पुन्हा आपल्याकडे येण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने १३ जुलै रोजी गंगाखेड तहसील कार्यालयात फेरफार नोंदीसाठी अर्ज दाखल केला. मात्र, त्यानंतरही लाचेची मागणी होत असल्याने तक्रारदाराने कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
तक्रारदाराने १० ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, परभणी येथे तक्रार दाखल केली. तक्रारीची सत्यता पडताळण्यासाठी एसीबीच्या पथकाने ११ ऑगस्ट रोजी जुन्या तहसील कार्यालय, गंगाखेड येथे पडताळणी केली. यावेळी पंच क्रमांक १ यांच्या समक्ष तलाठी रमेश लटपटे यांनी तक्रारदाराकडे फेरफार नोंद करण्यासाठी २० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यामुळे एसीबीकडून पुढील सापळा कारवाईची तयारी झाली. १३ ऑगस्ट रोजी तक्रारदाराची दोन्ही पंचांसमक्ष भेट घेतली. मात्र, यावेळी तलाठी लटपटे यांना आपल्यावर संशय आल्याचे तक्रारदाराने सांगितले.
आरोपीने मागणी केल्याप्रमाणे २० हजार रुपयांची लाच स्वीकारणार नसल्याची खात्री झाल्याचे तक्रारदाराने पंचांसमक्ष लेखी जबाबात नमूद केले. त्यामुळे प्रत्यक्ष सापळा कारवाई पुढे ढकलण्यात आली. तक्रारीची पडताळणी व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे गंगाखेड पोलिस ठाण्यात १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.०५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी तलाठी रमेश लटपटे यांना अद्याप अटक झालेली नसून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, परभणीच्या पोलिस निरीक्षक मनीषा पवार यांच्या नेतृत्वाखाली झाली. पर्यवेक्षक अधिकारी म्हणून पोलिस उपअधीक्षक महेश पाटणकर यांनी काम पाहिले. सापळा पथकात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक चंद्रशेखर निलपत्रेवार, पोलिस हवालदार सीमा चाटे, पोलिस कॉन्स्टेबल कल्याण नागरगोजे, राम घुले, शेख जिब्राहील, बोधनकर, चालक पोलिस कॉन्स्टेबल अनिल नरवाडे यांचा सहभाग होता.
या कारवाईस लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलिस अधीक्षक डॉ.अश्विनी जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. शेतजमिनीच्या वाटणीपत्रानुसार फेरफार नोंद करण्यासारख्या महसूल विभागातील नियमित कामासाठी लाचेची मागणी झाल्याचा आरोप असल्याने या प्रकरणाची महसूल वर्तुळातही चर्चा सुरू झाली. नागरिकांना शासकीय कामांसाठी अनावश्यक पैशांची मागणी करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार करावी असे एसीबीने कळवले आहे.