680 उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम बंद होणार pudhari photo
परभणी

Parbhani News : 680 उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम बंद होणार

निवडणूक आयोगाच्या खर्च मर्यादेची उमेदवारांकडून ऐशी की तैशी; 10 लाख 45 हजार मतदार बजावणार हक्क

पुढारी वृत्तसेवा

परभणी : जिल्हा परिषदेच्या 54 गट व 108 जणांसाठी जवळपास 680 उमेदवारांचे राजकीय भवितव्य शनिवारी (दि.7) मतपेटीत बंद होणार आहे. जिल्हा परिषदेच्या 54 गटांसाठी 247 तर पंचायत समितीच्या 108 जणांसाठी 433 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारी अर्जांचा पाऊस पडला होता, उमेदवारी अर्ज माघारी नंतरही मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. परभणी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 10 गटांसाठी जवळपास 56 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उतरले आहेत. त्यामध्ये 25 महिला तर 31 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. परभणी खालोखाल जिंतूर तालुक्यातील 10 गटांसाठी 39 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

यामध्ये 21 महिला तर 18 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. गंगाखेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 7 गटांसाठी 28 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामध्ये 23 महिला तर पाच पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. जिल्ह्यात सर्वाधिक जास्त महिला उमेदवार हे गंगाखेड तालुक्यातील 7 जिल्हा परिषद गटांमध्ये लढत आहेत. पूर्णा तालुक्यातील सहा गटांसाठी 29 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामध्ये 13 महिला तर 16 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे.

सेलू तालुक्यातील 5 गटांसाठी 19 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 12 महिला तर 7 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. पाथरी तालुक्यातील 5 गटांसाठी 26 उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यामध्ये 16 महिला तर 10 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. पालम तालुक्यातील 4 गटांसाठी 16 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात 5 महिला तर 11 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे.

मानवत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 4 गटांसाठी 21 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामध्ये 12 महिला तर 9 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. सोनपेठ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 3 गटांसाठी 13 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामध्ये 8 महिला तर 5 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे.

प्रचार बंद, लक्ष्मी अस्त्राचा मुक्त वापर

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गुरुवारी सायंकाळी प्रचार बंद झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या गट व गणांमध्ये लक्ष्मी अस्त्राचा मारा झाला असून मतदारांना लक्ष्मी दर्शन घडत असल्यामुळे मतदारही सुखावल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून आले. गुरुवारी रात्री व शुक्रवारी पहाटेपर्यंत हा खेळ रात्रीस चाले या उक्ती प्रमाणे विविध राजकीय पक्षाकडून मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदारांच्या हातात पॉकेट टेकवले जात होते. त्यासाठी स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते सोबत घे कुठेही दगा फटका होऊ नये म्हणून उमेदवारांनी पैसे वाटपासाठी आपल्या विश्वासातील माणसांची निवड केल्याचे दिसून आले. एकंदरीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांना प्रलोभने दाखवण्यासाठी 100 कोटींचा चुराडा झाल्याचे वास्तव आहे. जिल्हा परिषदेच्या उमेदवाराला निवडणूक आयोगाने 6 लाख रुपये खर्चाची मर्यादा आखून दिली असताना उमेदवार मात्र कोटींची उड्डाणे घेताना दिसली.

1278 मतदान केंद्रांवर होणार मतदान

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शनेिवारी 1278 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. यात 10 लाख 45 हजार 855 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 5लाख 42 हजार 937 पुरूष तर 5लाख 2 हजार 913 महिलांचा मतदारांचा समावेश आहे. 5 तृतीयपंथी मतदारही आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

कार्यकर्त्यांचीही चोख व्यवस्था

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने प्रमुख मदार असलेल्या कार्यकर्त्यांची उमेदवारांनी विशेष काळजी घेतल्याचे ठिकठिकाणी दिसून आले. कार्यकर्त्यांसाठी हॉटेल, ढाब्यावर- भोजनावळीसह अन्य विशेष व्यवस्थाही जवळपास सर्वच उमेदवारांनी केली होती. निवडणुकीचे बदललेले स्वरूप पाहता घरच्या भाकरी खाऊन नेत्याचा प्रचार करणारा कार्यकर्ता विरळ झाल्याचे चित्र या निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT