Parbhani Municipal Election 2026
परभणी, पुढारी वृत्तसेवा
शहर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण तापले आहे. अशातच मतदारांना प्रभावित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पैशांच्या खेळावर प्रशासनाने घाव घातला आहे. गंगाखेड नाका परिसरात भरारी पथकाने केलेल्या धडक कारवाईत एका दुचाकीस्वाराकडून तब्बल 5 लाख 60 हजार रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम जप्त केली असून, या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
रविवारी (दि. ११) पहाटे १२.४५ वाजता आदर्श आचारसंहितेअंतर्गत तैनात असलेले भरारी पथक क्रमांक ०१ गंगाखेड नाक्यावर नाकाबंदी करत असताना संशयास्पद हालचाली आढळून आल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक कासळे यांच्या मार्गदर्शनाखाली थांबविण्यात आलेल्या पांढऱ्या रंगाच्या दुचाकी क्रमांक एम. एच. २२, ए. एल. २१३८ या वाहनाच्या तपासणीत वाहनाच्या डिक्कीत रोख रक्कम आढळून आली. विशेष म्हणजे, संबंधित व्यक्तीकडे या रकमेबाबत एकही वैध कागदपत्र, व्यवहाराचा पुरावा किंवा समाधानकारक खुलासा नसल्याने, ही रक्कम निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणार होती का? असा सवाल उपस्थित होत आहे. भरारी पथकाने घटनास्थळीच पंचनामा करून रात्री १.१० ते १.४० वाजेच्या दरम्यान संपूर्ण कार्यवाही पार पाडली.
निवडणूक आयोगाच्या स्पष्ट आदेशानुसार बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली असून, सदर रक्कम जिल्हा कोषागारात जमा करण्यात आली आहे. या प्रकरणाचा राजकीय संबंध तपासण्याच्या दृष्टीने सखोल चौकशी सुरू असून, संबंधित व्यक्ती कोणाच्या संपर्कात होती, ही रक्कम कुणासाठी व कुठे पोहोचविण्यात येत होती, याचा छडा लावण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारांची संख्या मोठी असून, प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची उलाढाल होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. अशा परिस्थितीत प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे राजकीय पक्षांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कोणतीही गय केली जाणार नसल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.