परभणी : येणाऱ्या 15 जानेवारी रोजी परभणी शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपा व शिवसेना शिंदे गटाने एकमेकांना युतीसाठी टाळी दिली आहे. हिंदुत्ववादी मतांचे विभाजन टाळण्यासाठी शिवसेना व भाजपकडून युतीविषयी सकारात्मक चर्चा दोन्हींकडून सुरू असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
मागील काही महिन्यांपासून भाजपा व शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मनपा निवडणूक लढविण्यासंदर्भात नियोजन करण्यात येत आहे. यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या अनेक बैठकाही पार पडलेल्या आहेत. प्रारंभी हे दोन्ही राजकीय पक्ष स्वतंत्रपणे लढतील असे वाटत होते. शिवसेना व भाजपा पक्षाकडूनही स्वबळाचा नारा देत तशी तयारी चालविण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी भाजपा व शिवसेना शिंदे गटा या दोन्ही पक्षात बॅनर वारही रंगले होते.
शिवसेना शिंदे गटाच्या वतीने परभणीचा स्वाभिमान, शिवसेनेचा धनुष्यबाण अशा मजकुरासह नगर विकास विभागाच्या विविध योजनांविषयी बॅनरबाजी करण्यात आली होती. भाजपानेही मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली होती. दोन्ही पक्षात बॅनरवार रंगले असतानाच शिवसेना व भाजपाच्या युतीची चर्चा ही जोर धरू लागली आहे. नुकतीच भाजपाने माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर, माजी आ. सुरेश वरपूडकर, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या उपस्थितीत मनपा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
या मुलाखतीवेळी शिवसेनेसोबत युती करावी का? याविषयी कार्यकर्त्यांचेही मते जाणून घेण्यात आली होती. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनीही याच दिवशी मनपासाठी इच्छुक असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. या मुलाखती दरम्यान भाजपासोबत युती करण्याबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली होती. शिवसेना-भाजप युतीची चर्चा होत असल्यामुळे स्वबळाच्या भाषेला तूर्तास तरी पुर्णविराम मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.
विसर्जित मनपामध्ये भाजपाचे 8 तर शिवसेनेचे 6 नगरसेवक विजयी झालेले होते. युतीचे मिळून केवळ 14 नगरसेवक मनपामध्ये पोहोचलेले होते. आजघडीला विकसित परभणीचा नारा देत भाजपाला सत्तेच्या स्वप्नांपर्यंत पोहचायचे आहे. त्या दृष्टीने त्यांनी तयारी सुरू केलेली आहे. स्वतंत्रपणे लढल्यास हिंदुत्ववादी मतांचे होणाऱ्या मत विभाजनाचा धोका टाळण्यासाठी दोन्ही पक्षांनी युतीसाठी एकमेकांना टाळी दिली आहे.
असे असताना काही कार्यकर्त्यांकडून युतीबाबत संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. शिवसेना शिंदे गटाने जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्याकडे निवडणुकीचे पूर्ण अधिकार दिल्याची माहिती असून भरोसे हेच उमेदवारांच्या अंतिम निवडी करणार असल्याचे वास्तव आहे. शिवसेनेतील काही पदाधिकारी युतीबाबत विरोधी प्रतिक्रिया देतानाही दिसून येत आहेत. एकंदरीत शिवसेना-भाजप एक संघपणे लढले तरी सत्तेच्या स्वप्नांपर्यंत पोहोचण्यासाठी या दोन्ही पक्षांपुढे आव्हाने असल्याचेही वास्तव दिसत आहे.
सन्मानपूर्वक युती झाली तर स्वागतच : आनंद भरोसे
शिवसेना शिंदे गट- भाजप युतीसाठी दोन्ही पक्षाकडून एकमेकांना टाळी देण्यात आली आहे. भाजपासोबत सन्मानपूर्वक युती झाली तर आम्ही युतीसाठी अनुकूल आहोत असे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी सांगितले. भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्येही युतीविषयी सकारात्मक भावना असल्याचे कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे. काही जागा वाटपा संदर्भात युतीमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते असेही चित्र आहे.