परभणी : महानगरपालिका निवडणुकीसाठी गुरुवारी घेण्यात आलेल्या मतदानावेळी केंद्रावर मोठ्या प्रमाणात लागलेली मतदारांची रांग दिसत आहे.  pudhari photo
परभणी

Parbhani municipal election voting : महापालिकेसाठी सरासरी 70 टक्के मतदान

411 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद, सर्वच राजकीय पक्षांची धाकधूक वाढली

पुढारी वृत्तसेवा

परभणी: शहर मनपाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी (दि.15) सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत 343 केंद्रांवर मतदान घेण्यात आले. अनेक मतदान केंद्रावर मतदारांची शेवटच्या क्षणी मोठी गर्दी झाल्यामुळे सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरूच होती. सरासरी 70 टक्के मतदान झाले असून 411 उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला आज निवडणुक निकालानंतर होणार आहे.

सकाळी 9.30 वाजेपर्यंत जवळपास 16 प्रभागामध्येही मतदानाची प्रक्रिया थंडपणे चालताना दिसून आली. केवळ 9.10 टक्के मतदान झाले. पहिल्या दोन तासांत अपेक्षेप्रमाणे मतदार बाहेर पडले नाहीत. दुपारी 1.30 वाजेपर्यंत 35.23 टक्के मतांची नोंद झाली. सकाळपासून संथगतीने चालत असलेल्या मतदानाची टक्केवारी दुपारनंतर वाढताना दिसून आली. विशेषत: मुस्लिम बहुल भागांमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत 41 टक्के एवढी लक्षणीय मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले. दुपारी 3.30 वाजेपर्यंत एकुण 49.16 टक्के मतदान झाले.

दिव्यांग मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रशासनाच्या वतीने व्हिलचेअर व कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच बेघर निवारा केंद्रातील नागरीकांनीही मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान मतदान केेंद्रावरील परिस्थितीची पाहणी निवडणुक निरीक्षक मेघना कवाल, मुख्य निवडणुक निर्णय अधिकारी तथा मनपा आयुक्त नितीन नार्वेकर यांच्यासह टीमने भेट देवून केली.

काही प्रभागांमध्ये महिला मतदारांचा उत्साह विशेषत्वाने पाहायला मिळाला. निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहर महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर शहरातील सर्व 341 मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून थेट वेबकास्टिंग करण्यात येत होती.

निवडणूक विभाग प्रमुख व त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांकडून सीसीटीव्ही प्रणालीद्वारे प्रत्येक मतदान केंद्रावरील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत होते. मतदान केंद्रांवर पोलिस बंदोबस्त, होमगार्ड व प्रशासनाचे कर्मचारी तैनात होते. दिवसभरात कोणताही मोठा अनुचित प्रकार घडला नसल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले.

सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असलेल्या मतदानामुळे अंतिम मतदानाची टक्केवारी वाढल्याने आज जाहीर करण्यात येणाऱ्या निकालाकडे आता सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. मतदान संपल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांकडून आपापल्या कार्यालयात आकडेमोड केल्याचे पहावयास मिळाले.

आज 69 टेबलवर 5 ते 7 फेऱ्यांत मतमोजणी

मनपा निवडणूक अनुषंगाने शुक्रवारी (दि.16) मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून संपूर्ण प्रक्रिया काटेकोर सुरक्षा व्यवस्थेत होणार आहे. मतमोजणीसाठी एकूण 69 टेबलांची व्यवस्था केली असून या कामासाठी 276 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले. प्रत्येक प्रभागानुसार मतमोजणीची प्रक्रिया राबविली जाणार असून 5 ते 7 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. मतमोजणी केंद्र परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, उमेदवारांचे प्रतिनिधी व अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे.

मतमोजणी प्रक्रियेवर निवडणूक निरीक्षकांचे बारकाईने लक्ष राहणार असून, पारदर्शकता व कायद्याच्या चौकटीत संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मतमोजणी निकालाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून, महापालिकेतील सत्तासमीकरण कसे राहील, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता लागली. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांकडून जल्लोष होण्याची शक्यता लक्षात घेता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

मुस्लिम बहुल प्रभागात मतांची टक्केवारी लक्षणीय वाढली

शहर महापालिकेसाठी झालेल्या निवडणुकीत मुस्लिम बहुल प्रभागात मतांची लक्षणीय वाढलेली टक्केवारी भाजपासह शिवसेना शिंदे गटासाठी धोक्याची घंटा ठरल्याची शक्यता असून या प्रभागांमध्ये काँग्रेसह शिवसेना उबाठा पक्ष, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला मदत झाल्याचे बोलल्या जात आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 7, 8, 11, 12, 14 याठिकाणी दुपारी 1 वाजेपर्यंत 41 टक्के मतदान झाल्याचे दिसून आले. तदनंतरही मुस्लिम बहुल प्रभागांमध्ये मतांची टक्केवारी लक्षणीय वाढल्याचे स्पष्ट झाले.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लिम मतांवर डोळा ठेवून तब्बल 27 मुस्लिम उमेदवार निवडणुक रिंगणात उतरविले होते. शिवसेना उबाठा पक्षानेही मुस्लिम मते इतरत्र वळू नयेत, यासाठी तब्बल 17 उमेदवार निवडणुक रिंगणात उतरविले होते. खा.संजय जाधव यांनी आपल्या प्रचार सभांमधून व मेळाव्यांतून राष्ट्रवादी काँग्रेसला मत म्हणजे भाजपालाच मत आहे, त्यामुळे मुस्लिम बांधवांनी अपप्रचाराला बळी न पडता शिवसेना उबाठा पक्षाच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले होते. एकंदरीत मुस्लिम मते राष्ट्रवादी काँग्रेसच्या की उबाठा पक्षाच्या पारडयात पडली हे आज निवडणुक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

प्रशासन भाजपाचे सालगडी बनले : खा.जाधव यांचा आरोप

खा.संजय जाधव यांनी प्रभाग क्रमांक 8 मध्ये शारदा महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर सहकुटूंब मतदान केले. कुटूंबीयासोबत मतदानासाठी आलो असताना निवडणुक निरीक्षक मेघना कवाल यांच्यासोबत आपला वाद झाला. मतदान केंद्रात मी कुटूंबाला घेवून आलो असताना, त्या बाहेरच्या माणसांना घेवून मतदान केंद्रात कशाला येता असे म्हणाल्या.

परभणीचे जिल्हा प्रशासन भाजपाचे सालगडी बनले असून भाजपासह महायुतीतील अन्य घटक पक्षांनी मतदानासाठी 5 हजारांपासून 10 हजारापर्यंत पैसे वाटल्याचा आरोप त्यांनी केला. महायुतीतील पक्षांनी नगर पालिकेचाच पॅटर्न मनपा निवडणुकीत राबवल्याचा आरोप करत भाजपाजवळ मते मागायला नैतीकता नसल्याचे खा.जाधव माध्यमांशी बोलताना म्हणाले.

मोमीनपुऱ्यात मतदानावरून दोन उमेदवारांंत वाद

प्रभाग क्रमांक 6 मधील मोमीनपुरा मतदान केंद्रावर काँग्रेस पुरस्कृत उमेदवार रहिम खान व राष्ट्रवादी काँग्रेसचे आकाश लहाने यांच्यात वाद झाला. काँग्रेस पुरस्कृत उमेदवार हा मतदान केंद्राच्या बाहेर जवळच उभे राहून विनाकारण मतदारांना बोलत आहे. आडवाअडवी करत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आकाश लहाने यांनी केला. तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर याठिकाणी मोठया प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिसांनी मतदान केंद्राच्या सिमारेषेबाहेर पिटाळून लावल्याने पुढील अनर्थ टळला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT