परभणी : शहरात काही वर्षांपासून वाढत चाललेल्या अनधिकृत बॅनर, फलक व होर्डिंग्जच्या विळख्या विरोधात अखेर महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलत मोठी मोहीम हाती घेतली. शहरातील रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणे, शासकीय कार्यालय परिसरासह विविध भागांत विनापरवानगी उभारलेल्या राजकीय, धार्मिक, व्यावसायिक स्वरूपाच्या बॅनर-होर्डिंग्जवर थेट कारवाईचा बडगा उगारला. या संदर्भात मनपा आयुक्त नितीन नार्वेकर व उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे यांनी प्रशासनातील सर्व संबंधित विभागांना स्पष्ट आदेश जारी केले.
शहराच्या सौंदर्यावर विद्रूप परिणाम करणारे, वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे व नियमांची पायमल्ली करून उभारलेले अनधिकृत फलक तत्काळ हटवावेत, तसेच संबंधित व्यक्ती, संस्था व एजन्सींवर दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश दिले. यामुळे शहरातील अनधिकृत जाहिरातबाजी करणाऱ्या घटकांत एकच खळबळ उडाली. मनपा हद्दीतील सर्व सहायक आयुक्त, प्रभाग समिती अ, ब आणि क चे अधिकारी, शाखा अभियंते, कनिष्ठ अभियंते, मुख्य स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, संबंधित कर्मचाऱ्यांना विशेष जबाबदारी सोपविली.
प्रत्येक प्रभागात स्वतंत्र पाहणी मोहीम राबवून विनापरवानगी लावलेले बॅनर, स्वागत कमानी, वाढदिवस शुभेच्छा फलक, राजकीय जाहिराती, धार्मिक कार्यक्रमांचे फलक आणि व्यावसायिक होर्डिंग्ज हटविण्याची मोहीम सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, अनेक वेळा न्यायालयीन आदेश व शासनाच्या सूचनांनंतरही शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत जाहिरात फलक उभारले जात असल्याचे निदर्शनास आले.
राजकीय कार्यक्रम, वाढदिवस, सत्कार समारंभ, धार्मिक उत्सव व विविध व्यावसायिक उपक्रमांच्या नावाखाली शहरभर बॅनरबाजीचे जाळे निर्माण झाले होते. यामुळे शहराचे सौंदर्य बिघडण्यासह नागरिकांतही नाराजी वाढत होती. अनेक चौकांत फलकांमुळे वाहतूक संकेत झाकले जात असल्याने अपघाताचा धोका वाढल्याच्या तक्रारीही समोर येत होत्या. दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला.
शहरातील सर्व मोठ्या होर्डिंग्ज, जाहिरात फलक व धोकादायक संरचनांचे विशेष ऑडिट होणार आहे. प्रभाग समिती अंतर्गत अभियंत्यांना तातडीने कच्चे ऑडिट करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. वादळी वारे, मुसळधार पाऊस किंवा नैसर्गिक आपत्ती काळात अशा होर्डिंग्ज कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता लक्षात घेत ही उपाययोजना होत आहे.
मनपाने शहरातील सर्व मालमत्ताधारक, व्यावसायिक प्रतिष्ठाने आणि होर्डिंग एजन्सींनाही इशारा दिला. ज्या ठिकाणी विनापरवानगी जाहिरात फलक उभारले, त्या सर्वांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. नोटीस मिळाल्यानंतरही नियमांचे पालन न केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईसह कायदेशीर कारवाई हेोणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
महापालिका प्रशासनाच्या या धडक मोहिमेमुळे शहरातील अनधिकृत जाहिरातबाजीला मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काही काळात शहरातील प्रमुख रस्ते, चौक, शासकीय कार्यालयांचे परिसर आणि सार्वजनिक जागा अनधिकृत बॅनर व फलकांनी व्यापल्या होत्या. आता प्रशासनाने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे शहर पुन्हा सुशोभित आणि नियमबध्द करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेल्याचे मानले जात आहे. एकीकडे शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित ठेवण्याचा दावा होत असताना दुसरीकडे नियमांना हरताळ फासत उभारल्या जाणाऱ्या अनधिकृत बॅनर-होर्डिंग्जमुळे प्रशासनाची प्रतिमा धुळीस मिळत होती. मात्र आयुक्त आणि उपायुक्तांनी घेतलेल्या कठोर निर्णयामुळे नियम सर्वांसाठी समान असल्याचा ठोस संदेश गेला असून कोणत्याही राजकीय, धार्मिक किंवा व्यावसायिक दबावाला बळी न पडता कारवाई होणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले.