परभणी : शहर महानगरपालिकेसाठी १५ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी इच्छुकांची उदंड गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांत तब्बल १ हजार ८ उमेदवारी अर्जाची विक्री झालेली आहे.
प्रमुख राजकीय पक्षांनी मनपा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू केली असून त्यादृष्टीने व्युव्हरचना आखण्यासही सुरुवात झाली आहे. प्रमुख राजकीय पक्षांसह अनेकांनी कुठे संधी न मिळाल्यास अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. अनेक राजकीय पक्षातही इच्छुकांना डावलून ऐनवेळी नवीन नावे पुढे केल्यामुळे धुसफूस दिसून येत आहे.
उमेदवारी मिळवण्यासाठी काल एका पक्षात असलेले आज दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्याचेही चित्र दिसून येत आहे. अनेकांना कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची असून एकाने नाही संधी दिली, तर दुसऱ्याचा शोध घेऊ अशी मानसिकता उमेदवारांमध्ये दिसून येत आहे. ६५ जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी तब्बल १ हजार ८ उमेदवारी अर्जाची विक्री झाली. अर्ज दाखलसाठी २० कागदपत्रांची गरज लागणार असून या कागदपत्रांची पूर्तता करता करता इच्छुकांची धावपळ होताना दिसून येत आहे. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना मनपाकडून आवश्यक असलेली कागदपत्रे तात्काळ मिळत आहेत, परंतु सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कागदपत्र मिळवण्यासाठी मोठा आटापिटा करावा लागत असल्याचा सूर निघत आहे.
गुत्तेदार नसल्याचे स्वघोषणापत्र द्यावे लागणार
मनपा निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांना गुत्तेदार नसल्याचे स्वघोषणापत्र द्यावे लागणार आहे. मनपाने गुत्तेदार नसल्याचे प्रमाणपत्र सार्वजनिक बांधकामकडून घेण्यात यावे असे सांगितल्यानंतर इच्छुकांची मोठी धावपळ झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या संदर्भात हजारांवर अर्ज प्राप्त झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागही गोंधळून गेला. गुत्तेदार नसल्याचे प्रमाणपत्र द्यावयाचे नसून स्वघोषणापत्र जोडायचे आहे हे समजल्यावर अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला.