

छत्रपती संभाजीनगर : जुगारामध्ये कर्जबाजारी झाल्याने २०१८ साली महिलांचे मंगळसूत्र हिसकावणाऱ्या राज्य राखीव दलाचा (एसआरपीएफ) जवान योगेश सुरेश शिगनारे (मूळ रा. तेल्हारा, अकोला) याला पोलिसांनी अटक केली होती.
सातारा पोलिसांत गुन्हा दाखल
जवान योगेश सुरेश शिगनारे याने चोरीचे सोने पोलिस असल्याचे सांगून आईच्या आजारपणाचा बहाणा करत बाफना ज्वेलर्सला विक्री करून अडीच लाख घेतले होते. मात्र पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर ते सोने जप्त झाले होते. त्यामुळे बाफना ज्वेलर्सने न्यायालयात धाव घेतली होती. त्यावरून सोमवारी (दि. २२) आरोपी योगेशविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी सातारा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी विनोदकुमार दिलीपसिंग चौधरी जैन (६१, रा. देवळाई रोड, विजयंतनगर) हे आकाशवाणी चौकातील बाफना ज्वेलर्स येथे व्यवस्थापक म्हणून नोकरी करतात.
२०१९ साली त्यांनी न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाच्या आदेशाने त्यांनी सातारा पोलिसांत सोमवारी (दि.२२) तक्रार दिली. त्यानुसार, १५ मे २०१८ रोजी एनआरपीएफ योगेश शिनगारे हा युनिफॉर्ममध्ये त्यांच्या दुकानात आला. त्याने पोलिस असल्याचे ओळखपत्र दाखवून पत्नीचे मंगळसूत्र मोडायचे असल्याचे म्हणत जुने असल्याने पावती नसल्याचे सांगितले. आईच्या आजारपणासाठी पैशाची गरज असल्याची थाप मारली. पोलिस असल्याने त्याला बाजारभावाप्रमाणे ६१ हजारांची मोड खरेदी करून बँक खात्यात ऑनलाईन रक्कम दिली. त्यानंतर त्याने पुन्हा १६ मे ते २४ ऑगस्ट २०१८ या काळात सहा वेळा दुकानात येऊन पैसे नाहीत सोने आहे, आईच्या आजारपणासाठी नातेवाइकांनी दिले आहे, असे बहाणे करत मोडून २ लाख ४९ हजार २३३ रुपये घेतले.
अटक होताच सोने जप्त
११ ऑक्टोबर २०१८ रोजी सातारा पोलिस ठाण्याचे तत्कालीन उपनिरीक्षक चेतन ओगले, रतन डोईफोडे, एस. बी. सानप, जमादार मोहन चव्हाण, ससाणे, मरकड, गुन्हे शाखेचे राजेंद्र सोळुंके यांनी आरोपी शिनगारेला रेणुकामाता मंदिर परिसरातून अटक केली होती. त्याने बाफना ज्वेलर्समध्ये सोने विक्री केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी बाफना मधून सोन्याची लगड जप्त केली होती. तेव्हा बाफना ज्वेलर्सचे पैसेही गेले अन सोनेही गेल्याने धक्का बसला. फसवणूक झाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.