सुभाष कच्छवे
परभणी : मागील वर्षभरापासून सुरु असलेली ऑपरेशन टायगरची चर्चा संपली असून ठाकरेंच्या शिवसेनेच्या ६ खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी पत्र दिले आहे. त्यामध्ये परभणीचे खा. संजय जाधव यांचा समावेश असून त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. तो उद्या शिवसेनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात होऊ शकतो. यामुळे खा. संजय जाधव यांनी शिवसेना व ठाकरे कुटुंबीयांना कधीही सोडणार नाही, असे वारंवार काढलेले उदगार फोल ठरले असून शिंदे सेनेत प्रवेशाने खा. जाधवांची निष्ठा तकलादू ठरल्याचे दिसून येत आहे.
घरात कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना संजय जाधव यांनी शिवसेना नावाच्या झंझावाती कार्यपद्धती असलेल्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या संघटनात्मक कार्याची दखल घेत शिवसेनेने त्यांना परभणी शहरप्रमुखापासून ते जिल्हाप्रमुख, नगरसेवक पदापासून दोनवेळा परभणीची आमदारकी तर तीन वेळा खासदारकी बहाल केली होती. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणीमध्ये शिवसेना पक्षश्रेष्ठीने उमेदवार द्यावा आणि परभणीकर जनतेने त्यांना भरभरून मते देत विधानसभा-लोकसभेत पाठवावे असाच इतिहास राहिला आहे.
ज्यांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्याची पात्रता नसताना अनेक लोकांना शिवसेनेने परभणीत खासदार बनवल्याचा इतिहास आहे. शिवसेनेमध्ये फ़ूट पडल्यानंतर प्रारंभीपासून खा. जाधव हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चा होत्या. ऑपरेशन टायगर विषयी वर्षभरापूर्वी पत्रकारांनी खा. जाधव यांना पत्रकारांनी विचारल्यानंतर ऑपरेशन टायगर फेल असल्याचे खा. जाधव म्हणाले होते. तदनंतर त्यांनी मागील वर्षभरपासून राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टिकाही केली होती. शिवसेना पक्ष चोरल्याचा आरोप खा. जाधव यांनी एकनाथ शिंदेंवर केला होता. वारंवार ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समाचार घेताना दिसून आले होते.
मातोश्री शी कधीच प्रतारणा करणार नाही, असेही खा. जाधव यांनी वारंवार स्पष्ट केले होते. मागील काही दिवसापूर्वी निवडणुकीचे तंत्र बदलले असून आजच्या निवडणुका या पैशावर झाल्या आहेत. मातोश्री सोबत दगाबाजी करणार नाही, परंतु बदलत्या परिस्थितीत वेगळा निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते, असे सुचक वक्तव्य त्यांनी केले होते. मंगळवारी रात्री खा. जाधव विशेष विमानाने दिल्लीत पोहचले. बुधवारी लोकसभा अध्यक्षांना ठाकरेंच्या ६ फुटीर खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत पत्र दिल्यामुळे खा. जाधव यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश निश्चित झाला असून प्रवेशाची केवळ औपचारीकता बाकी आहे.
दरम्यान, खा. जाधव हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार हे स्पष्ट झाल्यानंतर समाज माध्यमांवरून त्यांच्यावर आगपाखड होताना दिसून येत आहे. परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेने उकीरड्याच्या जागी महाल निर्माण केले, परंतु शिवसेनेमुळे महालात गेलेल्यांना पक्षनिष्ठेची जाणिव राहिली नाही. हे आजपर्यंत शिवसेना सोडलेल्या खासदारांवरून दिसून येते. त्यात नव्याने खा. जाधव यांच्या नावाची भर पडली आहे. खा. जाधवांची पक्षनिष्ठा तकलादू होती का? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.