परभणी

परभणी: मानवत येथे हायवाला धडकून दुचाकीस्वार ठार

अविनाश सुतार

मानवत, पुढारी वृत्तसेवा: मानवत येथे रस्त्यावर धोकादायकरित्या लावलेल्या वाळूच्या हायवावर धडकून दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना आज (दि.१७) सकाळी ६ च्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील कैलास पेट्रोलपंप समोर घडली. सुरेश आसाराम हारकळ (वय ३२, रा. कोल्हा, ता. मानवत) असे मृत्युमुखी पडलेल्या शेतमजुराचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एका मित्राच्या मोटारसायकलमधील पेट्रोल संपल्याने सुरेश पेट्रोल आणण्यासाठी शहरातील रूढी शिवारातील कैलास पेट्रोलपंप येथे मोटारसायकल (एम एच २२ ए क्यू ३५१२) वरून गेले होते. यावेळी पेट्रोल घेऊन कोल्हा येथे जात असताना ते रस्त्यात धोकादायक रित्या लावलेल्या हायवा (एमएच १४ बी जे २५०६ ) ला जोरात धडकले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना पेट्रोलपंपावरील कर्मचारी व नागरिकांनी परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मृताचा चुलत भाऊ मुंजाभाऊ हारकाळ (वय ३८) यांच्या फिर्यादीवरून हायवा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत सुरेश हारकळ यांच्या पश्चात आई, पत्नी व लहान मुलगी असा परिवार आहे. पुढील तपास फौजदार दिगंबर पाटील करीत आहेत.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT