परभणी ः मनपाच्या मुख्य दरवाज्यासमोर ठिय्या देताना शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे व पदाधिकारी. दुसरे छायाचित्र मनपाचे तोडफोडीचे.  (छाया : राज मानवतकर)
परभणी

Parbhani News : वांगी रोडवरील मारोती मूर्ती हटविल्यावरून तणाव

शिवसेनेने मनपाला ठोकले टाळे; कार्यालयात तोडफोड, पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल

पुढारी वृत्तसेवा

परभणी : शहरातील वांगी रोड, अपना नगर येथील स्थापना केलेली मारोती मूर्ती ओटा उधवस्त करत मूर्ती कचऱ्याच्या गाडीतून नेत विटंबना करणाऱ्या मनपाच्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी, यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मंगळवारी (दि.24) मनपा समोर आंदोलन करत मनपाच्या मुख्य गेटला टाळे ठोकण्यात आले. संतापलेल्या शिवसैनिक व नागरिकांनी मनपा आयुक्तांच्या कक्षा शेजारी असलेल्या स्वीयसहाय्यकाच्या कक्षाची तोडफोडही केली. या प्रकरणी नवा मोंढा पोलिस ठाण्यात आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

2017 साली वांगी रोड, अपना नगर येथे मारोती मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. नित्यनेमाने तेथे पूजा-आर्चाही व्हायची. मंगळवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास मनपा प्रशासनाने मोठ्या पोलीस फौजफाट्यासह धाव घेत मारोती मंदिरासाठीचा असलेला ओटा उद्ध्वस्त केला. मंदिराचे टिनशेडही काढून टाकण्यात आले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे व शिवसैनिकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तदनंतर त्यांनी आपला मोर्चा मनपाकडे वळवत मुख्य कार्यालयाला टाळे ठोकले. यावेळी मनपा आयुक्तांच्या कक्षाच्या बाजुला असलेल्या स्वीयसहायकाच्या कक्षाची तोडफोडही करण्यात आली.

कुठल्याही पूर्व सूचना न देता मंदिर उधवस्त केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना असून मूर्तीची विटंबना करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यावर तत्काळ कार्यवाही करावी. मनपा प्रशासनाने माफी मागून सन्मानाने मूर्तीची परत त्याच ठिकाणी स्थापना करून स्वखर्चाने मंदिर बांधून देण्याची मागणी केली आहे. भल्या पहाटे आंधारात मारोती मूर्तीची विटंबना करत प्रशासनाने भ्याडपणा केल्याचा आरोप भरोसे यांनी केला आहे.

मनपाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी सदरील घटनेचे उत्तर देल्याशिवाय कार्यालयाचे टाळे उघडणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे मनपा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मारोती मूर्तीची विटंबना करणाऱ्या मनपाच्या दोषी अधिकाऱ्यावर कार्यवाहीची मागणी जिल्हाधिकारी, परभणी यांच्याकडेही लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा-भरोसे

हिंदुंच्या आराध्य दैवताच्या मूर्तीची विटंबना करत मूर्ती चक्क कचऱ्याच्या गाडीतून नेली जाते. मनपा प्रशासनाने अशी हिंमत केलीच कशी असा सवाल उपस्थित करत मारोती मंदिर पाडणे हे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावणारे आहे. मारोती मूर्तीची विटंबना करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. मनपा आयुक्त व महापौरांनी ही कार्यवाही जाणीवपूर्वक केल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT