Manwath Youth Killed Accident PUDHARI
परभणी

Parbhani Accident | मानवतमध्ये शनिवार ठरतोय घातवार: दोन दुचाकींच्या धडकेत युवकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

मानवत तालुक्यातील खरबा–करंजी रस्त्यावर अपघात

पुढारी वृत्तसेवा

Manwath Two Bike Collision Youth Killed

मानवत: तालुक्यातील खरबा–करंजी या रस्त्यावर शनिवारी (दि. ११) दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या दोन दुचाकींच्या समोरासमोरच्या भीषण अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. या दुर्दैवी घटनेमुळे करंजी गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नितीन अरुणराव जाधव असे मृत युवकाचे नाव असून ते त्यांच्या एमएच-२२ एजी-८४५४ क्रमांकाच्या दुचाकीवरून मानवतहून करंजीकडे जात होते. त्याचवेळी झोडगावकडून एमएच-१६ डीएन-४०२४ क्रमांकाच्या दुचाकीवरून स्वप्निल विष्णुपंत पवार व रामा वामनराव पवार हे दोघे रूढी पाटीकडे येत होते.

खरबा–करंजी मार्गावर दोन्ही दुचाकी समोरासमोर आल्याने त्यांच्यात जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की तिन्ही जण रस्त्यावर फेकले गेले. अपघातात नितीन जाधव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी मानवत येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष चव्हाण यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, अपघातातील स्वप्निल पवार व रामा पवार हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

मयत नितीन जाधव हे कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य होते. त्यांच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन लहान मुली असा परिवार आहे. तरुण वयात कुटुंबाचा आधार हरपल्याने करंजी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच मानवत ग्रामीण रुग्णालयात नातेवाईक व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी शेख जावेद यांनी ग्रामीण रुग्णालयात येऊन पंचनामा व अन्य प्रक्रिया पूर्ण केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT