मानवत: मानवत येथील शिक्षकाविरुद्ध जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर यांनी आज (दि.३) तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली. इयत्ता आठवीच्या अल्पवयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींसमोर अश्लील भाषेत शब्द उच्चारून व विनाकारण छडीने मारहाण केल्याप्रकरणी शिक्षकाविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
येथील मोंढा परिसरातील शाळेतील प्राथमिक पदवीधर शिक्षक दत्ता गंगाधर होगे (वय ४५) या शिक्षकाविरुद्ध शाळेतील तक्रार पेटीत इयत्ता आठवीच्या अनेक विद्यार्थिनींनी तक्रारी टाकल्या होत्या. याची दखल घेत मुख्याध्यापिका छाया उमाजी गायकवाड (वय ५२, रा. लोकमान्यनगर, परभणी) यांनी बुधवारी (दि.२) पोलीस ठाण्यात शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा वर्तणूक नियम ३ (१) (ब) नुसार जिल्हा परिषद सेवेतून निलंबित केले. या कालावधीत त्याचे मुख्यालय पालम पंचायत समिती दिले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून अद्यापपर्यंत त्या शिक्षकाला अटक झाली नसल्याची माहिती आहे.