Bull Injured Fox Attack Manwat  AI Photo
परभणी

Parbhani Fox Attack | पिसाळलेल्या कोल्ह्याचा कोल्हावाडीत धुमाकूळ; तिघांसह बैल जखमी

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; वन विभागाकडून तातडीच्या कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Bull Injured Fox Attack Manwat

मानवत : मानवत तालुक्यातील कोल्हावाडी येथे पिसाळलेल्या कोल्ह्याने शुक्रवारी (७ ऑगस्ट) दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास शेतात काम करणाऱ्या नागरिकांवर अचानक हल्ला केला. या घटनेत तीन जण जखमी झाले असून एका बैलालाही कोल्ह्याने चावा घेतला. या प्रकारामुळे गावासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हावाडी गावाच्या पश्चिमेकडील शेतशिवारात शेतकरी शेतीची कामे करत असताना पिसाळलेला कोल्हा अचानक आला आणि उपस्थितांवर झडप घातली. या हल्ल्यात पुष्पाताई सुधाकर भिसे (वय ५५), मुक्ताबाई भगवान भिसे (वय ५६) आणि पांडुरंग पंडितराव भिसे (वय ४५) हे जखमी झाले. जखमींना वाचविण्यासाठी ग्रामस्थ धावून येत असतानाच कोल्ह्याने पांडुरंग भिसे यांच्या बैलालाही चावा घेतला.

घटनेनंतर जखमींना तातडीने परभणी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू असून प्रतिबंधात्मक औषधोपचारही करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, हल्ल्यानंतर पिसाळलेला कोल्हा परिसरातून पसार झाला असून त्यामुळे कोल्हावाडीसह आजूबाजूच्या शेतशिवारातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेकांनी खबरदारीचा उपाय म्हणून शेतात जाणे टाळल्याचे सांगितले.

या पार्श्वभूमीवर वन विभागाने तातडीने पथक पाठवून पिसाळलेल्या कोल्ह्याचा शोध घेऊन योग्य ती कारवाई करावी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT