

Purna Crop Damage
पूर्णा : पूर्णा तालुक्यातील सुरवाडी शेतशिवारात अज्ञात व्यक्तीने सुडबुद्धीने कापूस व भाजीपाला पिकावर तृणनाशकाची फवारणी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत देगाव येथील शेतकरी विश्वनाथ गणपी पटवे यांचे सुमारे दोन एकर क्षेत्रातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांचा एक संपूर्ण पीक हंगाम धोक्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विश्वनाथ पटवे यांनी सुरवाडी शेतशिवारातील आपल्या शेतात खरीप हंगाम २०२६ मध्ये कापूस व विविध भाजीपाला पिकांची लागवड केली होती. पिकांची वाढ चांगली झाली होती आणि उत्पादनाची अपेक्षाही होती. मात्र, अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी शेतात तृणनाशकाची फवारणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे कापूस व भाजीपाला पिके जळून वाळू लागली असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
घटना लक्षात येताच शेतकरी पटवे यांनी पूर्णा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. संबंधित आरोपीचा तातडीने शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाकडून मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या पिकांचे जाणूनबुजून नुकसान करण्याच्या घटना चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.