Manwat Nagarparishad Campaign
मानवत : मानवत नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगू लागली आहे. कडाक्याच्या थंडीतही प्रचारामुळे शहरात राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रचारासाठी येणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांमुळे मानवत तसेच परिसरातील हॉटेल आणि ढाबे आतापासूनच हाऊसफुल झाले आहेत. तर आतापर्यंत ६ उमेदवारांनी रिंगणातून माघार घेतली आहे.
नगरपालिकेच्या 11 प्रभागांमधील 22 सदस्य आणि नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना-भाजप युती यांच्यातच मुख्य लढत रंगण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राणी अंकुश लाड, तर युतीकडून शिवसेनेच्या अंजली महेश कोक्कर या उमेदवार आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, प्रभाग क्र. 11 मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अॅड. किरण बारहाते यांचे तिकीट ऐनवेळी नाकारण्यात आल्याने त्यांनी पत्नी रेश्मा बारहाते यांचा अर्ज नगराध्यक्ष पदासाठी दाखल केला असून, या घडामोडीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. अॅड. बारहाते यांनी सोशल मीडियावर उघडपणे नाराजीही व्यक्त केली आहे.
नगराध्यक्ष पदासाठी सात अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी तीन अपात्र ठरल्याने आता चार अर्ज शिल्लक आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 21 नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत असून यानंतरच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
11 प्रभागांसाठी एकूण 117 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 46 अर्ज अपात्र ठरले असून फक्त 71 उमेदवार पात्र ठरले आहेत. जिल्ह्यातील इतर नगरपालिकांच्या तुलनेत मानवत येथे ही संख्या सर्वात कमी आहे. दरम्यान, 19 व 20 नोव्हेंबर रोजी चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार पांडुरंग माचेवाड आणि मुख्याधिकारी महेश गायकवाड यांनी दिली.