Land Records Office Break Manwat
मानवत : शहराबाहेरील तहसीलच्या प्रशासकीय इमारत परिसरात असलेल्या भूमी अभिलेख व दुय्यम निबंधक कार्यालयात अज्ञात चोरट्यांनी फोडाफोड केल्याची घटना मंगळवारी (दि.९) सकाळी 9 वाजता उघडकीस आली. परंतु रात्री 7:30 वाजता येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एकाच वेळी दोन्ही कार्यालयांचे कुलूप तोडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी कर्मचारी हनुमंत पेरकवार कार्यालयात आल्यानंतर मुख्य दरवाज्याचे कुलूप तुटलेले आढळले. भूमी अभिलेख कार्यालयातील एका लोखंडी कपाटाचे दार वाकवून उघडण्यात आले होते, तर दुसऱ्या कपाटातील कागदपत्रांची उलथापालथ करण्यात आली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व पंचनामा केला. याप्रकरणी भूमी अभिलेख चे प्रभारी उपाधीक्षक दत्ता खुणे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु दोन्ही कार्यालयातील एकही वस्तू चोरीस गेली नसल्याचे तक्रारीत दाखल आहे.
दरम्यान, दुय्यम निबंधक कार्यालयात सीसीटीव्ही यंत्रणा नसल्याचे समोर आले असून भूमी अभिलेख कार्यालयातील कॅमेरे नादुरुस्त असल्याची माहिती आहे. महत्त्वाचे जमीन व्यवहारांचे दस्तऐवज येथे ठेवले जात असतानाही सुरक्षा यंत्रणा सक्षम नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
या कार्यालयांत रोख रकमेचे व्यवहार होत नसल्यामुळे चोरट्यांचा नेमका हेतू काय होता, याबाबत चर्चा रंगल्या आहेत. पोलिस तपासातूनच या प्रकरणामागील सत्य स्पष्ट होणार आहे.