Water Tank Agitation Parbhani Pudhari
परभणी

Maratha Reservation Protest | मराठा आरक्षणासाठी कोल्हा येथे चार युवकांचे पाण्याच्या टाकीवर आंदोलन

तहसील, पोलीस व आरोग्य पथक घटनास्थळी; १२ तासांनंतरही आंदोलक ठाम

पुढारी वृत्तसेवा

Water Tank Agitation Parbhani

मानवत : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तसेच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मानवत तालुक्यातील कोल्हा येथे चार युवकांनी बुधवारी (दि. ९) गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. सकाळी सात वाजल्यापासून सुरू असलेल्या या आंदोलनाला तब्बल १२ तास उलटूनही युवक खाली उतरले नसल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

भागवत भिसे, अनिल तारे, कृष्णा भिसे आणि बाबासाहेब भिसे या चार युवकांनी कोणतीही पूर्वसूचना न देता सकाळी सातच्या सुमारास गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात येत आहे.

युवक पाण्याच्या टाकीवर चढल्याची माहिती मिळताच तहसील प्रशासन, पोलीस आणि आरोग्य विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तलाठी रामेश्वर शिंदे, पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी तसेच आरोग्य विभागाच्या दोन रुग्णवाहिका आणि कर्मचारी घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत.

प्रशासनाच्या वतीने आंदोलकांना खाली उतरून आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात येत आहे. मात्र, आंदोलक आपल्या मागणीवर ठाम असून त्यांनी अद्याप खाली उतरण्यास नकार दिला आहे. दीर्घकाळापासून युवक टाकीवर असल्याने त्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.

दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस व प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून आंदोलकांशी चर्चा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT