Manwat Human Skeleton
मानवत : मानवत-मानोली मार्गावर शहरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील शेताच्या बांधावर मानवी सांगाडा आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रविवारी (दि. ७ जून) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सांगाड्याची ओळख अद्याप पटलेली नसून मृत्यूचे कारणही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मानवत येथील अनिल उर्फ पिनू कोल्हेकर हे गोविंद शिवाजी मोहिते यांच्या शेतात ट्रॅक्टरद्वारे रोटावेटरचे काम करत होते. यावेळी शेताच्या बांधावर त्यांना मानवी सांगाडा दिसून आला. त्यांनी तात्काळ शेतमालक गोविंद मोहिते यांना माहिती दिली. त्यानंतर माजी नगरसेवक दत्तराव चौधरी यांनी घटनास्थळी भेट देत मानवत पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देवकते, पोलीस हवालदार शेख गाजियोद्दीन तसेच अन्य पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून प्राथमिक तपास सुरू केला. सांगाड्याजवळ पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची हाफ पॅन्ट आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, सोमवारी (दि.८) मानवत ग्रामीण रुग्णालयात सांगाड्याचे वैद्यकीय परीक्षण करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख आदिल यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली. सांगाड्यावरील मांसल भाग पूर्णपणे नष्ट झाल्याने नियमित शवविच्छेदन करणे शक्य नव्हते. त्यामुळे डीएनए तपासणीसाठी हाडांचे नमुने आणि दात जतन करण्यात आले असून ते पुढील तपासासाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार आहेत.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक वाघमारे, प्रभारी पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे, पोलीस कर्मचारी शेख गाजियोद्दीन (मुन्नू), सय्यद फय्याज, विजय लबडे आदी उपस्थित होते. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नगरपालिकेच्या सहकार्याने सांगाड्याचा दफनविधी करण्यात आला.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, पांढरा टी-शर्ट आणि काळी हाफ पॅन्ट परिधान केलेली तसेच काही महिन्यांपासून बेपत्ता असलेली व्यक्ती याबाबत कोणाकडे माहिती असल्यास मानवत पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
या घटनेमुळे मानवत शहर आणि परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देवकते करीत आहेत.
पोलिसांसमोर अनुत्तरित प्रश्नांचे गूढ
मानोली रोडलगत सापडलेल्या मानवी सांगाड्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हा सांगाडा नेमका कोणाचा आहे? संबंधित व्यक्ती बेपत्ता असल्याची कुठे नोंद आहे का? मृत्यू नैसर्गिक होता की घातपातामुळे झाला? मृतदेह याच ठिकाणी होता की आणून टाकण्यात आला? सांगाडा किती दिवसांपासून तेथे पडून होता? तसेच डीएनए अहवालातून त्याची ओळख पटणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून डीएनए अहवाल आणि इतर तांत्रिक पुरावे या गूढ प्रकरणाचा उलगडा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.