पुण्याहून नांदेडकडे जाणारी कार काम सुरू असलेल्या पुलाखाली कोसळली Pudhari
परभणी

Parbhani Car Accident | परभणी–मानवत महामार्गावर कार पुलावरून कोसळली; सहा जण जखमी

किन्होळा शिवारात अपघातांची मालिका सुरूच; आठवडाभरात पाच अपघातांत एकाचा मृत्यू, १३ जण जखमी

पुढारी वृत्तसेवा

Parbhani Manwat Highway Accident

मानवत : परभणी–मानवत राष्ट्रीय महामार्गावरील किन्होळा खरवडे परिसरात अपघातांची मालिका सुरूच असून, बुधवारी (दि. २८) पहाटे पाचच्या सुमारास पुण्याहून नांदेडकडे जाणारी कार काम सुरू असलेल्या पुलाखाली कोसळली. या अपघातात कारमधील सहा प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची नावे समजू शकली नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच १२ डीवाय ०१०५ क्रमांकाची इनोव्हा कार पुण्याहून नांदेडकडे जात होती. किन्होळा शिवारातील पुलाजवळ रस्त्याचे काम सुरू असताना कार चालकाला परिस्थितीचा अंदाज न आल्याने वाहन पुलाखाली कोसळले. या दुर्घटनेत कारमधील सहा जण जखमी झाले.

परभणी–मानवत महामार्गावरील या पुलाचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, काम सुरू असलेल्या ठिकाणी पुरेसे दिशादर्शक फलक, बॅरिकेड्स आणि वाहनचालकांना सावध करणाऱ्या सूचना नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे वाहनचालकांना पुढील रस्त्याचा अंदाज येत नसून, अपघातांचा धोका वाढला आहे.

या महामार्गावरून दिवसरात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. अशा वर्दळीच्या मार्गावर पुलाचे काम सुरू असताना वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. मात्र, अपघातांची पुनरावृत्ती होत असल्याने संबंधित यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

किन्होळा पूल बनला अपघातांचा केंद्रबिंदू!

सात दिवसांत पाच अपघात; एकाचा मृत्यू, १३ जण जखमी

किन्होळा खरवडे परिसरातील दुरुस्तीसाठी खोदून ठेवलेल्या पुलाजवळ २१ ते २८ ऑक्टोबरदरम्यान दोन कार आणि तीन दुचाकींचे असे एकूण पाच अपघात झाले. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला, तर १३ जण जखमी झाले आहेत. सलग घडणाऱ्या अपघातांमुळे हा पूल वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे.

असे झाले अपघात

- २१ ऑक्टोबर : दुचाकीच्या अपघातात मानवत येथील कार्तिक गडदे या तरुणाचा मृत्यू झाला. अन्य दोघे गंभीर जखमी झाले.

- २२ ऑक्टोबर (पहाटे) : एमपी ४७ झेडसी ९३६३ क्रमांकाच्या दुचाकीच्या अपघातात परराज्यातील मजूर दाम्पत्य आणि त्यांचा मुलगा जखमी झाले.

- २२ ऑक्टोबर (दुपारी) : परभणीहून बीडकडे जाणाऱ्या एमएच २२ बीजे ०२१६ क्रमांकाच्या दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये आदिनाथ रणेर आणि त्याचे दोन मित्र जखमी झाले.

- २४ ऑक्टोबर (सायंकाळी) : एमएच २२ बीसी ६१८४ क्रमांकाच्या कारचा अपघात झाला. यामध्ये परभणी येथील दोघे जण गंभीर जखमी झाले.

- २८ ऑक्टोबर (पहाटे) : पुण्याहून नांदेडकडे जाणारी इनोव्हा कार पुलाखाली कोसळली. यामध्ये सहा जण जखमी झाले.

सात दिवसांत पाच अपघात होऊनही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने पुलाच्या कामाच्या ठिकाणी तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT