Godavari Dudhna river flood
मानवत: मानवत तालुक्यात सतत पडत असलेल्या पावसाने नदी नाले तुडुंब भरून वाहत असून दुधना नदीला आलेल्या पुरामुळे तालुक्यातील टाकळी निळवर्ण, मंगरूळ बुद्रुक तर गोदावरीला पूर आल्यामुळे थार या तीन गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. शेतातील उभी पिके आडवी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कुंभारी तांडा येथे वादळीवाऱ्यासह वीज पडून एक बैल ठार झाला आहे.
मानवत तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे तसेच धरणातून पाणी मोठ्या प्रमाणात सोडल्यामुळे दुधना व गोदावरी नदीला मोठा पूर आल्याने अनेक पुलावरून पाणी वाहत असल्याने टाकळी निलवर्ण मंगळ बुद्रुक व थार या तीन गावाचा पूर्णता संपर्क तुटला असून गावात पुराचे पाणी शिरल्याने ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहे.
रामपुरी बु येथे असलेल्या गोदावरी नदीला पूर आला आहे. नदी व ओढ्यालगत असलेल्या शेतात मोठया प्रमाणात पाणी शिरल्याने शेतातील हातातोंडांशी येणारे कापूस, सोयाबीन च्या मुख्य पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी ता 22 दुपारी 3 च्या सुमारास तालुक्यातील कुंभारी तांडा येथे वादळी वाऱ्यासह पाऊस होऊन वीज पडल्याने अनंता प्रभाकर चव्हाण यांच्या शेताच्या आखाड्यात बांधलेला बैल जागीच ठार झाला. दुधना नदीला आलेल्या इरळद ते वालूर हा रस्ता बंद झाला आहे.
गोदावरी व दुधनेला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी सतर्क झाले असून एनडीआरएफ च्या टीम तैनात केल्या जाणार असल्याची माहिती तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी दिली.