Crime News file photo
परभणी

Parbhani Crime | मानवत येथे तरुणावर प्राणघातक हल्ला; गुप्तांग छाटले, शरीरावर गंभीर वार

मानवत बसस्थानक परिसरातील व्यापारी संकुलाच्या मागील बाजूस घटना

पुढारी वृत्तसेवा

Manwat Brutal Attack on Youth

मानवत: येथे एका व्यक्तीवर झालेल्या भीषण हल्ल्याची घटना समोर आली असून यात जखमी व्यक्तीचे गुप्तांग छाटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. जखमी व्यक्तीवर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मानवत शहरातील बसस्थानक परिसरातील आठवडी बाजार व्यापारी संकुलाच्या मागील बाजूस ही घटना घडली. नगरजवळा येथील रामभाऊ आसाराम होगे (वय ४५) हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, हा प्रकार १९ मार्चच्या रात्री घडला असावा. जखमी अवस्थेत पडलेले होगे यांना स्थानिक नागरिकांनी पाहून तातडीने १०८ रुग्णवाहिकेद्वारे मानवत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

तपासात जखमीच्या छाती, पोट आणि शरीराच्या इतर भागांवर गंभीर जखमा आढळल्या असून धारदार शस्त्राने हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याशिवाय, त्यांच्या गुप्तांगावरही गंभीर इजा झाल्याची बाब समोर आली आहे, ज्यामुळे घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष चव्हाण यांनी सांगितले की, सायंकाळी सुमारे ५ वाजता रुग्णाला १०८ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात आणण्यात आले. त्याच्या छाती व पोटावर खोल जखमा होत्या, डावा हात फ्रॅक्चर अवस्थेत होता तसेच गुप्तांगावरही इजा आढळली. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस जमादार मुन्नू शेख आणि पोलीस हवालदार नारायण सोळंके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मात्र, या प्रकरणी अद्याप मानवत पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा नोंद झालेला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे हल्ल्याचे कारण, स्वरूप आणि आरोपींबाबत अद्यापही स्पष्टता आलेली नाही.

गजबजलेल्या बसस्थानक परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तत्काळ तपास करून आरोपींना अटक करावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT