Manwat APMC strike ends
मानवत : मजुरी दरवाढीच्या प्रमुख मागणीसाठी १६ फेब्रुवारीपासून सुरू असलेले हमाल माथाडी मजूर युनियन (लाल बावटा) यांचे बेमुदत कामबंद आंदोलन अखेर रविवारी (ता. १) चर्चेनंतर मागे घेण्यात आले. तोडगा निघाल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
गेल्या १५ दिवसांपासून संपामुळे मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत कापूस, भुसार व इतर शेतीमालाचे खरेदी-विक्री व्यवहार पूर्णपणे ठप्प होते. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता.
हमाली दरवाढीच्या मुद्द्यावर संघटना ठाम होती. अखेर बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर, सचिव शिवनारायण सारडा, संचालक व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे, जिनिंग संघटनेचे अध्यक्ष गिरीश कत्रूवार, आडत संघटनेचे अध्यक्ष आश्रोबा कुऱ्हाडे, हमाल माथाडी संघटनेचे अध्यक्ष रंगनाथ वावरे तसेच शेतकरी प्रतिनिधी रामभाऊ शिंदे आणि गोविंद घांडगे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाला. त्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
संपामुळे बंद असलेले कापूस व इतर भुसार मालाचे व्यवहार ५ मार्चपासून पूर्ववत सुरू करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर यांनी केले आहे.