Manwat Manoli Youth Death
मानवत : मोटारसायकल व सिमेंट वाहतूक करणाऱ्या ऑटोच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तालुक्यातील मानोली येथील युवकाचा शुक्रवारी (दि.16) सकाळी 9 च्या सुमारास उपचारादरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये दुर्देवी मृत्यू झाला.
किरण संजय भांड वय 21 असे त्या दुर्देवी युवकाचे नाव असून शहराबाहेरील बायपास ला जाणाऱ्या संत सावता माळी टी पॉईंटवर सोमवारी (दि. 12) सायंकाळी ५.३० च्या सुमारास मोटरसायकलला (एम एच 22 जे 9459 ) सिमेंट वाहतूक करणाऱ्या पिवळ्या रंगाच्या पियाजिओ ऑटोने जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला होता.
धडक दिल्यानंतर ऑटो चालक घटनास्थळावरून फरार झाला होता. परिसरातील नागरिकांनी तत्काळ जखमीला मदत करत रुग्णवाहिका बोलावली. किरण भांड याला प्रथम मानवत येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यास परभणी येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला हलविण्यात आले होते.
परंतु, उपचार सुरु असताना आज सकाळी 9 च्या सुमारास त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. किरण भांड हा डी फॉर्मसीच्या दुसऱ्या वर्गात शिकत होता. आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या संजय भांड यांचा तो एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.