Manvat Taluka Chhatrapati Shivaji Maharaj Statue
मानवत : मानवत तालुक्यातील केकरजवळा येथे कोणतीही अधिकृत परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा गावात आणून बसविल्याने सोमवारी (दि. २९) तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस व तहसील प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बंदोबस्त वाढवला.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. २८) रात्रीच्या सुमारास काही ग्रामस्थांनी केकरजवळा गावातील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील एका रिकाम्या मैदानात लोखंडी स्टँडवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणून ठेवला. सोमवारी सकाळी ही बातमी पसरताच प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली . कोणतीही अधिकृत परवानगी न घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप बोरकर व नायब तहसीलदार स्वप्ना अंभोरे यांनी नियमांनुसार परवानगी घेऊनच पुतळा उभारावा, अशा सूचना ग्रामस्थांना दिल्या.
मात्र, काही ग्रामस्थ प्रशासनाच्या सूचनांना प्रतिसाद देण्यास तयार नसल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून बंदोबस्त वाढवला आहे.
केकरजवळा येथे सार्वजनिक ठिकाणी पुतळा उभारण्यास ग्रामपंचायतीचा विरोध नसल्याचे सरपंच संतोष लाडाने स्पष्ट केले आहे. मात्र शासनाची रीतसर परवानगी घेऊनच पुतळा उभारावा, अशी ग्रामपंचायतीची भूमिका आहे. येत्या दोन दिवसांत ग्रामसभा घेऊन आवश्यक नोटीस काढत नियमानुसार पुतळा उभारण्यास परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शासनाच्या नियमांनुसार व अधिकृत परवानगीनेच उभारावा, असे आवाहन तहसीलदार पांडुरंग माचेवाड व पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांनी ग्रामस्थांना केले आहे. तसेच नागरिकांनी शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले आहे.