Fraud Case  pudhari photo
परभणी

Manvat Online Fraud | मानवत येथील बँक कर्मचाऱ्याची 29 लाखांची ऑनलाईन फसवणूक; चार बनावट कंपन्यासह मोबाईलधारकांवर गुन्हा

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवत फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

Online Banking Fraud Parbhani

मानवत : मोबाईलवर मेसेज व लिंक पाठवून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवत मानवत येथील एका बँक कर्मचाऱ्याची तब्बल 29 लाख 7 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चार बनावट कंपन्या आणि चार मोबाईलधारकांविरुद्ध मंगळवारी (दि. 7) रात्री सुमारे पावणेदहाच्या सुमारास स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काही मोबाईल क्रमांक परदेशातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अर्जुन अशोक पवार (वय 36, रा. पावरलूम, मानवत) असे फसवणूक झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून ते कॅनरा बँकेत कार्यरत आहेत. ही घटना 20 डिसेंबर 2025 ते 2 फेब्रुवारी 2026 या कालावधीत घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी पवार यांच्या मोबाईलवर लिंक पाठवून त्यांना ‘A4 व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग रिसर्च सोसायटी’ या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर ‘वेल्थ अलायन्स ट्रेनिंग टीम A11’ या दुसऱ्या ग्रुपमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. ‘टोटेम’ नावाचे ॲप डाउनलोड करण्यास सांगत ते इन्स्टिट्यूशनल ट्रेनिंग ॲप असल्याचा भास निर्माण करण्यात आला.

या ग्रुपमधील फंड मॅनेजर म्हणून स्वतःची ओळख करून देणाऱ्या ‘रवी’ नावाच्या व्यक्तीने ‘जेन्स इंटरप्रायझेस’च्या नावावर असलेल्या ॲक्सिस बँकेच्या खात्यात पैसे गुंतवण्यास सांगितले. सुरुवातीला पवार यांनी 16 जानेवारी रोजी 50 हजार, 19 जानेवारी रोजी 1 लाख 30 हजार आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने एकूण 5 लाख 22 हजार रुपये गुंतवले. ॲपमध्ये 5 ते 15 टक्क्यांपर्यंत परतावा मिळत असल्याचे दाखवण्यात येत होते.

यानंतर ‘मोहन पाटील’ नावाच्या ग्रुप अॅडमिनने ‘चेंडू फॅक्स’ या आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास 100 टक्के परतावा मिळेल, असे सांगून आणखी गुंतवणुकीस प्रवृत्त केले. विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला आरोपींनी पवार यांच्या खात्यात दोन वेळा मिळून 9 लाख 10 हजार रुपये परताव्याच्या नावाखाली जमा केले.

यामुळे विश्वास बसलेल्या पवार यांनी ‘जेन्स इंटरप्रायझेस’, ‘सागर टेक्सटाईल’, ‘तन्वी इंटरप्रायझेस’ आणि ‘अदबास क्लोथिंग प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपन्यांमध्ये एकूण 29 लाख 7 हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र त्यानंतर कोणताही परतावा मिळाला नाही.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पवार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देवकते करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT