पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: खुजडा (ता.पूर्णा) शिवारातील गट क्रमांक १५३ मध्ये खदान खोदून घरकुल बांधकामासाठी गौनखनिज देण्याचे कारण दाखवून हटकरवाडी येथील शेतकरी पांडुरंग सदगर यांच्याशी गुत्तेदार झंपलवाड यांनी करारनामा केला. त्य़ासाठी २०० ब्रास मुरुम उत्खननाची परवानगी घेतली होती. परंतु, तब्बल २, ५५७.२२ ब्रास खडक आणि मुरुम काढल्याचा प्रकार २० मार्चरोजी ड्रोन कॅमेरा व्दारे मोजणी केलेल्या अहवालातून समोर आला आहे.
खुजडा येथील खदानीतून अवैध उत्खनन हे एकच प्रकरण नाही. तर असे अनेक किस्से आहेत की, त्यात महसूल अधिकाऱ्यांनी महसूल, गौण खनिज व पर्यावरण खात्याचे नियम धाब्यावर बसवून पध्दतशीर आपले उखळ पांढरे करुन शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवला आहे.
खुजडा येथील गट क्रमांक १५३ मधील खदानीतून परवानगी व्यतिरिक्त अधिक प्रमाणात मुरुम उत्खनन करुन रेल्वे ब्रिज बांधकामासाठी विक्री केला आहे. त्याची चौकशी करुन दोषी महसूल कर्मचा-यांवर कारवाई करण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष राजकूमार सुर्यवंशी यांनी नुकतेच दोन दिवस आमरण उपोषण केले होते.