Jintur ST Depot Workers Protest
जिंतूर : एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित आर्थिक आणि अन्य मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने मंगळवारी (दि. ३) जिंतूर एसटी आगारात घंटानाद आंदोलन करण्यात आले. आपले नियमित कर्तव्य बजावल्यानंतर कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी संघटनेने यापूर्वीच प्रशासनाला लेखी निवेदन देऊन तीन टप्प्यांत राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणताही ठोस पुढाकार घेण्यात आलेला नसल्याने संघटनेने घंटानाद आंदोलनाचे पाऊल उचलले.
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ६० टक्के करावा, दिवाळी बोनस म्हणून २५ हजार रुपये द्यावेत, तसेच सणासाठी देण्यात येणारी अग्रीम उचल दिवाळीपूर्वीच मिळावी, अशा प्रमुख मागण्या संघटनेने केल्या आहेत.
या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास पुढील टप्प्यात द्वारपाल आंदोलन, तर त्यानंतर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने लेखी निवेदनातून दिला आहे. जिंतूर आगारातील घंटानाद आंदोलनामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे राज्यातील एसटी महामंडळाचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.