Suspension File Photo
परभणी

Parbhani Pregnant Woman Death | रुग्णवाहिका सेवेतील दोन डॉक्टरांसह दोन चालक निलंबित

स्त्री रुग्णालयातील जिंतूर येथील गर्भवतीसह बाळ मृत्यू प्रकरण; सात सदस्यीय समितीकडून चौकशी सुरू

पुढारी वृत्तसेवा

Parbhani Jintur Pregnant Woman Infant Death

परभणी : जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालयात वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने जिंतूर येथील गर्भवती महिला आणि तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या गंभीर प्रकरणाची आरोग्य विभागाने दखल घेतली आहे. या प्रकरणात निष्काळजीपणाचा ठपका ठेवत रुग्णवाहिका सेवा पुरविणाऱ्या सुमित कंपनीतील दोन डॉक्टरांसह दोन रुग्णवाहिका चालक अशा चौघांना सोमवारी रात्री निलंबित करण्यात आले. या कारवाईमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक दयानंद मोतीपवळे यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय विशेष चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. समिती सोमवारी (दि. १०) सायंकाळी परभणीतील जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालयात दाखल झाली. सदस्यांनी रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करून घटनेशी संबंधित विविध बाबींची माहिती घेत चौकशीला सुरुवात केली.

मंगळवारी (दि. ११) जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कक्षात संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच घटनेशी निगडित व्यक्तींचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. रुग्णवाहिका उपलब्ध होण्यास झालेला विलंब, संबंधित कर्मचाऱ्यांची भूमिका, रुग्णवाहिका सेवेशी झालेला संपर्क आणि रुग्णाला वेळेत वैद्यकीय मदत मिळाली का, यासह विविध बाबींची समितीकडून पडताळणी करण्यात येत आहे. मयत महिलेच्या पतीसह नातेवाईकांचेही जबाब नोंदविण्यात आले आहेत.

या प्रकरणी रुग्णवाहिका सेवेतील डॉ. कुलदीप चोरमले, डॉ. अभिजीत इप्पर तसेच रुग्णवाहिका चालक मोहम्मद जलाल आणि केशव यादव या चौघांवर कारवाई करण्यात आली आहे. सुमित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या चौघांच्या निलंबनाचे आदेश काढल्याची माहिती आहे.

चौकशी समितीने संबंधितांची तब्बल दोन तास कसून चौकशी केली. घटनेच्या अनुषंगाने त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेण्यात आली. रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देताना नेमक्या कोणत्या टप्प्यावर आणि कशाप्रकारे हलगर्जीपणा झाला, याचा शोध घेण्यावर समितीचा भर आहे. प्राथमिक चौकशीत रुग्णाला वेळेत वैद्यकीय सेवा तसेच रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेत गंभीर हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र, या प्रकरणातील अंतिम जबाबदारी निश्चित करण्यासाठी चौकशी समितीचा सविस्तर अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.

या घटनेमुळे शासकीय रुग्णालयातील रुग्णवाहिका सेवेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध होणे आणि वेळेत उपचार मिळणे अत्यावश्यक असताना घडलेल्या या प्रकाराची आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे. चौकशी समितीच्या अंतिम अहवालानंतर आणखी कोणावर कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT