गणेश ठोंबरे Pudhari
परभणी

Parbhani Youth Death | मराठा आरक्षणाच्या नैराश्यातून तरुणाने जीवन संपविले

जिंतूर तालुक्यातील भोसी येथील घटनेने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

Maratha Reservation Agitation

जिंतूर : मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नसल्याच्या नैराश्यातून जिंतूर तालुक्यातील भोसी येथील एका ३० वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविल्या ची धक्कादायक घटना रविवारी ( दि. ९ ) सायंकाळी घडली. गणेश आश्रोबा ठोंबरे असे मृत युवकाचे नाव आहे. त्यांने लिहिलेली एक चिट्ठी पोलिसांना सापडली आहे.

आरक्षणासाठी जीवनयात्रा संपवली

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश ठोंबरे यांनी रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घरात दोरीने गळफास घेतला. कुटुंबीयांच्या हे लक्षात येताच त्यांनी गणेश यांना तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी मुंडे यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

पोलिसांनी घटनास्थळी व रुग्णालयात जाऊन पंचनामा केला असता, मृताच्या खिशात एक सुसाईड नोट आढळून आली. "मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मी फाशी घेत आहे, सरकारने आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा," असा मजकूर या चिट्ठीत लिहिला होता. याप्रकरणी बामणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस हवालदार ठाकूर पुढील तपास करत आहेत.

कुटुंबाला शासकीय मदत व नोकरीची मागणी

मृताचे चुलत भाऊ व पंचायत समिती सदस्य भास्करराव ठोंबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश गेल्या दोन-तीन दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरून तीव्र नैराश्यात होते. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. गणेश यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असल्याने शासनाने त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी आणि आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नातेवाइकांनी केली आहे. सोमवारी सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT