Jintur Kavda Gram Panchayat  Pudhari
परभणी

Parbhani News | कवडा ग्रा.पं.तील आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप निराधार; चौकशीला सामोरे जाण्याची तयारी : राजेश चव्हाण

सीसी रोड, नाली व पाणीपुरवठ्याची कामे पूर्ण; जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली तक्रार राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

Jintur Kavda Gram Panchayat

जिंतूर : कवडा ग्रामपंचायतीच्या कारभारात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप काही माध्यमांमधून करण्यात आले आहेत. मात्र, हे आरोप निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा सरपंच कल्पना चव्हाण यांचे पती राजेश चव्हाण यांनी केला आहे. ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या विकासकामांची सर्व कागदपत्रे उपलब्ध असून, कोणत्याही सक्षम यंत्रणेमार्फत चौकशी करण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले.

कवडा ग्रामपंचायतीच्या निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप करत काही व्यक्तींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याचे समोर आले आहे. या तक्रारीतील आरोपांमध्ये तथ्य नसून, विकासकामांबाबत चुकीची माहिती पसरवून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.

चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, चेक क्रमांक ९२०८५ अन्वये १ लाख ८१ हजार रुपये खर्च करून कवडा येथील मंजूर दलित वस्तीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत सीसी रोड आणि नालीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच चेक क्रमांक ९२०९० अन्वये १० हजार रुपये खर्च करून आपत्कालीन लाईटची खरेदी करण्यात आली आहे.

याशिवाय चेक क्रमांक ९२०९१ अन्वये ५८ हजार रुपये खर्च करून गावातील नादुरुस्त पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत करण्यासाठी मोटार, स्टार्टर आणि वायर खरेदी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या साहित्याच्या माध्यमातून गावातील पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत झाला असून, नागरिकांना त्याचा लाभ मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या सर्व खर्चाशी संबंधित कागदपत्रे ग्रामपंचायतीच्या कार्यालयीन नोंदीमध्ये उपलब्ध असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. कामांच्या कॅश नोंदी, एमबी रेकॉर्ड, कम्प्लेशन प्रमाणपत्रे तसेच काम पूर्ण झाल्याचे छायाचित्रे उपलब्ध असून, चौकशीदरम्यान ही कागदपत्रे सादर करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

प्रत्यक्ष पाहणी करून चौकशीची मागणी

जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली तक्रार चुकीच्या व अपुऱ्या माहितीवर आधारित असल्याचा दावा करत चव्हाण यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी आणि जिंतूर येथील संबंधित अधिकाऱ्यांची समिती नेमून विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी केली आहे. कामे प्रत्यक्षात झाली आहेत की नाहीत, याची पडताळणी केल्यानंतर वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कवडा येथील दलित वस्तीतील सीसी रोड आणि नालीच्या कामासाठी निधी उपलब्ध नसल्याने विकासाच्या दृष्टीने जवळच्या उपलब्ध निधीतून काम करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कामे प्रत्यक्ष अस्तित्वात असतानाही काही व्यक्तींकडून खोटे आरोप करण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पडताळणी करावी, अशी मागणी राजेश चव्हाण यांनी केली आहे. चौकशीत तक्रारदारांचे आरोप चुकीचे अथवा खोटे असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT