Jintur taluka Jam Khurd sisters molested
चारठाणा: जाम खुर्द (ता. जिंतूर, जि. परभणी) येथे अल्पवयीन मुलगी व तिच्या बहिणीचा पाठलाग करून त्यांच्यावर विनयभंग केल्याप्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा दिवसांत तपास पूर्ण करून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दोन महिन्यांपूर्वी जाम खुर्द (ता. जिंतूर) येथील पीडित मुलगी व तिची बहीण घरी परतत असताना आरोपी विनोद गणेश राठोड व श्रावण बाबाराव चव्हाण (वय 20, रा. जांब खु) यांनी त्यांना मिठी मारून वाईट नजरेने फोटो काढले. तसेच हे फोटो व्हायरल करण्याची व ठार मारण्याची धमकी दिल्याने पीडितांनी सुरुवातीला या घटनेची माहिती दिली नव्हती.
मात्र, नंतर वडिलांनी विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी संपूर्ण प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून चारठाणा पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याआधारे गुन्हा दाखल केला. फक्त सहा दिवसांत तपास पूर्ण करून दोन्ही आरोपींविरुद्ध गुरूवारी (दि. 4) परभणी येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक परदेशी, अपर पोलिस अधीक्षक गुंजाळ व विभागीय पोलिस अधिकारी वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली चारठाणा पोलीस उपनिरीक्षक सुनील अंधारे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक झुंजुर्डे यांनी केला.