पाथरी : पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोपेगाव रोड येथे पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथक क्रमांक दोनच्या कर्मचाऱ्यांनी एका टिप्पर वाहन थांबवून त्याची तपासणी केली. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली. यामध्ये टिप्पर वाहनात क्षमतेपेक्षा अधिक मालाचे वाहतूक होत असल्याचे समोर आले असून संबंधित वाळू वाहतुकीचा अधिकृत पर्वाना देखील नव्हता. या टिप्पर वाहनासह लोकेशन देणाऱ्या एकास ताब्यात घेण्यात आले. त्यामध्ये सहा लाख साठ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
वाहनचालक गजानन प्रल्हादराव पांचाळ (रा. खेरडा, ता.पाथरी) वाहन मालक चंद्रसिंग एकनाथ नाईक (रा.माळीवाडा, पाथरी) आणि पोलिसांचे लोकेशन देणारा ओम बापूराव नाईक (रा. मर्डसगाव, ता.पाथरी) याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांच्या ताब्यातून एक टिप्पर, २ दुचाकी, दोन ग्रास वाळू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भिसे करीत आहेत. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे अर्जुन टरके शेख इर्शाद वाघमारे चुडावकर वाहगुळे यांनी केली.
लोकेशन यंत्रणा भारी
गोदावरी पात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणावर मागील काही दिवसापासून सुरू आहे. यावर नजर ठेवण्यासाठी लोकेशन यंत्रणा महसूल आणि पोलिस या दोन्ही यंत्रणेपेक्षा भारी होती. त्यामुळे अवैध वाहनांचा थान पत्ता लागत नसे मात्र आता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी थेट खडक मोहीम हाती घेतल्याने लोकेशनधारकांनाही पळता भुई थोडी झाली आहे.