अवैध फटाके कारखान्यावर धाड मारत पहाणी करताना पोलिस अधिकारी. pudhari photo
परभणी

illegal firecracker factory raid : बेकायदेशीर फटाके कारखान्यावर धाड, लाखोंचा स्फोटक साठा जप्त

समसापूर शिवारात पोलिसांची कारवाई; दोघांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

परभणी : तालुक्यातील समसापूर शिवारात बेकायदेशीररीत्या फटाके तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची धक्कादायक बाब ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी (दि.2) सायंकाळी अचानक धाड टाकून केलेल्या कारवाईत उघडकीस आली आहे. यात स्फोटक पदार्थ, रासायनिक पावडर तसेच मोठ्या प्रमाणावर तयार सुतळी बॉम्ब असा तब्बल 1 लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, गुरुवारी (दि.2) सायंकाळी 4.10 वाजेच्या सुमारास समसापूर शिवारातील गट क्रमांक 94 येथील शेतात पोलिसांनी छापा टाकला. याठिकाणी टिनशेड व सिमेंट बांधकामाच्या सहा खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फटाके तयार करण्यासाठी लागणारे स्फोटक साहित्य साठवून ठेवण्यात आले होते.

या कारवाईत ॲल्युमिनियम पावडर, सल्फर, सालपेटर, विविध रासायनिक मिश्रण, तयार सुतळी बॉम्ब, फ्यूज, सुतळी दोरी, पॅकिंग साहित्य व लेबल्स असा मोठा साठा आढळून आला आहे. विशेष म्हणजे काही खोल्यांमध्ये तयार सुतळी बॉम्ब पोत्यांमध्ये भरून ठेवलेले होते, ज्यामुळे मोठ्या अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात होती.

याप्रकरणी संजय सदाशिव शिंदे (वय 56) व सुदर्शन सदाशिव शिंदे (वय 46, दोघेही रा.लहुजी नगर,परभणी) यांच्या विरोधात स्फोटक पदार्थ अधिनियम 1908 तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये ग््राामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीररीत्या फटाके निर्मितीचा उद्योग सुरू केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी वाघमारे, सहायक पोलिस निरीक्षक राजगुरू, पोलिस उपनिरीक्षक मोहिते, पोना धबडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. तसेच शुक्रवारी (दि.3) दुपारच्या सुमारास पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाची पाहणी केली आहे.

ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पोलिस उपनिरीक्षक मोहिते यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. आरोपींना सध्या नोटीसवर सोडण्यात आले असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू करण्यात आलेला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, बेकायदेशीर फटाके निर्मितीमुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रहिवाशांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या अशा बेकायदेशीर स्फोटक कारखान्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT