Parbhani Hingoli MLC Election  pudhari photo
परभणी

Parbhani Hingoli MLC Election : ठाकरे सेनेकडून डॉ. नावंदर रिंगणात उतरणार

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक; शिंदे सेनेकडून सईद खान यांचे नाव चर्चेत

पुढारी वृत्तसेवा

परभणी : सोमवारी (दि.18) परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर झाला. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महानगरप्रमुख डॉ. विवेक नावंदर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असून काँग्रेसकडून अूनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे. शिंदेच्या शिवसेनेकडून अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे.

मागील विधान परिषद निवडणुकीत विप्लव बाजोरिया यांच्या रुपाने शिवसेनेने अकोला येथून उमेदवार आयात केला होता. बाजोरिया यांनी काँग्रेसचे उमेदवार माजी आ. सुरेश देशमुख यांचा 35 मतांनी पराभव केला होता. बाजोरिया यांना 256 तर माजी आ. सुरेश देशमुख यांना 221 मते मिळाली होती.

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधान परिषदेवर गेल्यानंतर बाजोरिया यांनी परभणी-हिंगोलीकडे पूर्णपणे पाठ फिरवल्याचे दिसून आले होते. शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या या जागेसाठी महायुतीसह महाविकास आघाडीतील काही जण इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. ठाकरे शिवसेनेच्या वतीने शिवसेना महानगरप्रमुख डॉ. विवेक नावंदर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

आ.डॉ. राहुल पाटील यांचे डॉ. नावंदर निकटवर्तीय मानले जातात. विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांसमवेत डॉ. नांवदर यांचे सलोख्याचे संबंध आहेत. मितभाषी व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. विधानसभा निवडणुकीत आ.डॉ. राहुल पाटील यांच्या निवडणुकीची प्रमुख जबाबदारी डॉ. नांवदर यांनी सांभाळली होती. आजतागायत शिवसेनेच्या अनेक उमेदवारांसाठी त्यांनी लोकसभा-विधानसभा निवडणुकीत व्यवस्थापन केलेले आहे. आ.डॉ. राहुल पाटील आपल्या सहकारी डॉक्टर मित्रासाठी विधान परिषद निवडणुकीत ताकद लावू शकतात.

सईद खान यांना उमेदवारी द्या

पाथरी : सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामे करणारे शिवसेना शिंदे गटाचे नेते सईद खान यांना परभणी- हिंगोली विधान परिषदेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी परभणी-हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडुन केली जात आहे. सईद खान हे आरोग्य सेवेतून हजारो गरजूंना उपचार करून नवजीवन मिळवून देण्याचे काम करत आहेत.

गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदतीचा हात देण्याचे कामही करतात. तसेच युवकांसाठी रोजगार मेळावे घेत रोजगार संधीसह कोरोनात गरजू कुटुंबांना मोठा आधार देण्याचे कार्य केले. अतिवृष्टीग्रस्तांसह शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम त्यांनी केले. यामुळे दोन्ही जिल्ह्यात शिवसेनेची विचारधारा व पक्ष घराघरापर्यंत पोहचवण्याचे कार्य त्यांच्या हातून झाले. यासाठी सईद खान यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी होत आहे.

हत्तीअंबीरे यांनी काँग्रेसकडे मागितली उमेदवारी

काँग्रेस अनुसूचित जाती विभाग प्रदेशाध्यक्ष तथा तेलंगणा प्रभारी डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी उमेदवारी मागितली आहे. आपण मागील अनेक वर्षांपासून काँग्रेसची विचारधारा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत पक्ष संघटन मजबुत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. आपणास उमेदवारी दिल्यास महाविकास आघाडीतील सर्व पक्षाशी समन्वय ठेवून निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील राहिल, असे म्हटले आहे.

18 जून रोजी होणार मतदान

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी 25 मे ते 1 जून या दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 18 जूनला स्थानिक स्वराज्य संस्था निव्ाडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. होऊ घातलेली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक रंगतदार व चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी एकसंघपणे लढणार काय? या विषयी उत्स्ुाकता दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT