Parbhani Heavy Rain : नेते बांधावर, शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न !  File Photo
परभणी

Parbhani Heavy Rain : नेते बांधावर, शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न !

काँग्रेसची समिती आज पाहणी करणार; शेतशिवारात दुःखाचे सावट

पुढारी वृत्तसेवा

Parbhani: Heavy rains in the district and back water released from Jayakwadi and Majalgaon dams cause havoc

सुभाष कच्छवे

परभणी : जिल्ह्यात अतिवृष्टी व जायकवाडी, माजलगाव धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या बँक वॉटरमुळे हाहाकार उडाला असून हजारो हेक्टर क्षेत्र बाधित झाल्यामुळे होत्याचे नव्हते झाले असून शेतकरी हतबल झाला आहे. अशा कठीण प्रसंगामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी नेते मंडळी सरसावली असून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. काँग्रेसतर्फे नियुक्त करण्यात आलेली समितीही शनिवारी परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करणार आहे.

मागील तीन महिन्यांपासून जिल्हाभरात अवकाळी पाऊस, ढगफुटी, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतशिवारात आज मरणासन्न अवस्था दिसून येत आहे. जून, जुलै, ऑगस्टमध्ये पावसाने हाहाकार माजवल्यानंतर सप्टेबरमध्ये तर अतिवृष्टी व धरणातून सोडलेल्या पाण्याने हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली जात शेतकऱ्यांच्या उरल्या सुरल्या स्वप्नांचीही राखरांगोळी झाल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यात अतिवृष्टी व बॅक वॉटरच्या पाण्याने हाहाकार माजवल्यानंतर शेतकरीवर्गामध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्य दिसून येत आहे.

गोदावरी व इतर नद्यांच्या काठावर असलेली गावे पूर्णपणे बाधित झाले आहेत. अनेक गावांमध्ये पाणी घुसल्याने राहत्या घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन नागरिकांना इतरत्र स्थलांतरित करण्याची वेळ आली आहे. पशुधना चेही वाहून जात व पुराच्या पाण्यामध्ये अडकून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात सापडला असताना जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोडर्डीकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

शासन तुमच्या पाठीशी आहे. प्रत्येकाला नुकसानीची मदत मिळणार आहे असा आश्वासक शब्दही दिला. काही दिवसांपासून खा. संजय जाधव, माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर, आ.डॉ. राहुल पाटील, आ. राजेश विटेकर, आ. रत्नाकर गुट्टे, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, माजी आ. विजय भांबळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर देत शासन मदत मिळवून देण्याचा शब्द दिला. शेतकरी हतबल असताना लोकप्रतिनिधींनी तूर्तास किमान दिलासा देण्याचे काम तरी केले आहे.

काँग्रेस समिती आज जिल्हा दौऱ्यावर

मराठवाडा विभागामध्ये अतिवृष्टी झाल्याने नुकसानीची पाहणी करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशान्वये परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. सदरील समिती आज अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करणार आहे, समितीमध्ये नांदेडचे खा. रवींद्र चव्हाण, माजी खा. अॅड. तुकाराम रेंगे पाटील, आ.डॉ. प्रज्ञा सातव, काँग्रसचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, प्रा. यशपाल भिंगे, प्रा. संदीपकुमार देशमुख यांचा समावेश आहे. सदरील समिती अतिवृष्टीग्रस्त भागाच्या पाहणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करणार आहेत,

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT