

परभणी/जिंतूर: नाशिकहून नांदेडकडे ‘अल्का वाईन शॉप’साठी जाणाऱ्या ट्रकचा बनावट अपघात घडवून ८८ लाख १७ हजार रुपयांचा विदेशी दारूसाठा लंपास केल्याप्रकरणी जिंतूर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने मुख्य आरोपीसह तीन साथीदारांना अटक केली आहे. कारवाईत एकूण ६५.३९ लाख रुपये किमतीचा विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.
सिंड्राम कंपनी, नाशिक येथून विविध कंपन्यांची सुमारे १.३८ कोटी रुपये किमतीची दारू ‘अल्का वाईन शॉप’ नांदेडला पोहोचविण्यासाठी ट्रक क्रमांक एमएच १५ व्ही १७३५ ने पाठवला होता. ट्रक मार्गात असताना प्रभाकर विश्वनाथ घुगे व त्याचा मुलगा अनिल प्रभाकर घुगे यांनी बनावट अपघात घडवून दारू लंपास केली. त्यांनी ट्रक चिंचोली दराडे शिवारात उलथवून स्थानिकांनी चोरी केली असे दाखवून जिंतूर पोलीस ठाण्यात खोटी तक्रार केली.
पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक जिवन बेनिवाल यांच्या पथकाने तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे घटनास्थळाची पाहणी करून ही फिर्याद खोटी असल्याचा निष्कर्ष काढला. त्यानंतर पुणे शिक्रापूर येथून प्रभाकर घुगे याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि गुन्ह्यात सहभागी तीन साथीदारांची नावे उघड केली.
त्यानुसार, अनिल शिवाजी चव्हाण (वय ३२), रविंद्र हरिभाऊ पवार (वय ३०), सचिन अशोक सोळंके (वय ३५) यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले गेले. ही कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ, सहाय्यक पोलीस अधीक्षक जिवन बेनिवाल, जिंतूर व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली. तसेच जालना पोलीस निरीक्षक पंकज जाधव आणि त्यांच्या पथकाने देखील सहकार्य केले.