पूर्णा तालुक्यात हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत Pudhari Photo
परभणी

Parbhani Heavy Rainfall | पूर्णा तालुक्यात पावसाचा कहर, नदी-नाल्यांना पूर, हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली!

जनजीवन विस्कळीत, माटेगावजवळ वाहतूक ठप्प

पुढारी वृत्तसेवा

Rain wreaks havoc in Purna taluka, flooding rivers and canals, crops on thousands of hectares under water!

पूर्णा : पूर्णा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आला असून, शेतशिवारात सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे. याचा सर्वाधिक फटका खरीप पिकांना बसला असून, हजारो हेक्टरवरील उभी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

पावसाचा जोर अद्याप कायम असून, कधी मुसळधार तर कधी रिमझिम सरी सतत बरसत आहेत. यामुळे शेतात पाणी साचल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक गोठ्यांमध्ये पाणी शिरल्याने सर्वत्र चिखल झाला आहे. ओढ्यांना पूर आल्याने शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाणेही अशक्य झाले आहे. सखल भागातील सोयाबीन, कापूस आणि तूर यांसारखी खरीप पिके पाण्याखाली गेल्याने ती सडण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, शाळकरी मुलांचीही मोठी गैरसोय होत आहे.

माटेगाव येथील वाहतूक ठप्प

दरम्यान, पूर्णा ते झिरोफाटा मार्गावर माटेगावजवळ असलेल्या थुना नदीवरील पुलाचे बांधकाम अपूर्ण असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. पूर्वीचा कमी उंचीचा पूल पाडून त्या जागी उंच पुलाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला असून, वाहतुकीसाठी तयार केलेला पर्यायी रस्ता पाण्याखाली गेला आहे. गेल्या दोन दिवसांपासून हा मार्ग पूर्णपणे बंद असून, पाण्याची पातळी वाढत असल्याने वाहतूक अद्याप ठप्प आहे. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT