Organic Farming : जैविक शेतीतील परभणीचा ठसा जगभर उमटला file photo
परभणी

Organic Farming : जैविक शेतीतील परभणीचा ठसा जगभर उमटला

बायोमिक्सला आंतरराष्ट्रीय मान्यता ; आयसीआरआयएसएटीकडून 4 टनाची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Parbhani has made its mark on the global stage in organic farming

परभणी, पुढारी वृत्तसेवा : शाश्वत, पर्यावरणपूरक आणि जैविक शेतीला नवे बळ देणाऱ्या येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी दाद मिळाली. विद्यापीठ विकसित बायोमिक्स या जैविक उत्पादनाच्या गुणवत्ता, परिणामकारकता आणि उपयुक्ततेवर विश्वास व्यक्त करत हैदराबाद येथील आंतरराष्ट्रीय अर्ध-शुष्क उष्णकटिबंधीय पीक संशोधन संस्था (आयसीआरआयएसएटी) यांनी तब्बल ४ टन बायोमिक्सच्या पुरवठ्याची मागणी नोंदविली आहे. यामुळे विद्यापीठाच्या संशोधन कार्याला जागतिक पातळीवर मान्यता मिळाल्याचे मानले जात असून, मराठवाड्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब ठरली.

या पार्श्वभूमीवर परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातून आयसीआरआयएसएटी, हैदराबादकडे रवाना होणाऱ्या बायोमिक्सच्या ट्रकला विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.इन्द्र मणि यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी, संशोधक आणि शास्त्रज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुलगुरू प्रा. डॉ. इन्द्र मणि म्हणाले, बायोमिक्स हे उत्पादन शाश्वत शेतीच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी असून जमिनीची सुपीकता वाढविणे, पिकांची वाढ अधिक सक्षम करणे, सूक्ष्मजीवांची संख्या वाढविणे आणि रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करणे यामध्ये त्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळे जैविक शेतीला चालना देण्यासाठी हे उत्पादन प्रभावी साधन ठरत आहे.

ते पुढे म्हणाले की, जगातील अग्रगण्य कृषि संशोधन संस्थांपैकी एक असलेल्या आयसीआरआयएसएटी कडून मिळालेली ही मागणी म्हणजे बायोमिक्सच्या गुणवत्तेची आणि संशोधनाच्या विश्वासार्हतेची आंतरराष्ट्रीय पातळीवरील अधिकृत पावती आहे. या यशामुळे विद्यापीठाच्या संशोधनाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळेल, तसेच भारतीय शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक, पर्यावरणपूरक आणि कमी खर्चिक जैविक तंत्रज्ञान पोहोचण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी बायोमिक्स संशोधन केंद्राच्या कार्याचे विशेष कौतुक करत संशोधन पथकाचे अभिनंदन केले.

सातत्यपूर्ण संशोधन, गुणवत्ता नियंत्रण आणि शेतकरी हिताच्या दृष्टीने केलेल्या प्रयत्नांमुळेच हे यश मिळाल्याचे नमूद केले. ट्रक रवाना करण्याच्या कार्यक्रमास संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य (परभणी), सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजी शिंदे (गोळेगाव), वनस्पती रोगशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रफुल्ल घंटे, मृदाशास्त्र विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर, बायोमिक्स संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रशेखर अंबाडकर, संशोधन सहाय्यक कपिल निर्वळ, संशोधक व अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, बायोमिक्सला मिळालेल्या या आंतरराष्ट्रीय मागणीचे शेतकरी, कृषि तज्ज्ञ आणि कृषि क्षेत्रातील विविध घटकांकडून स्वागत करण्यात येत आहे. भविष्यात देशांतर्गत आणि परदेशातील बाजारपेठेत बायोमिक्सची मागणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, यामुळे परभणीच्या कृषि संशोधनाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळण्याबरोबरच जैविक शेतीच्या प्रसारालाही मोठी चालना मिळणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT