Political Clash Gangakhed Pudhari
परभणी

Parbhani Politics | गंगाखेडमध्ये राजकीय संघर्ष पेटला; अॅड. मिथिलेश केंद्रेंसह चौघांवर गुन्हा दाखल

मारहाण, शिवीगाळ आणि पिस्तूल रोखून धमकावल्याचा आरोप; आमदार गुट्टेंविरोधात कारवाईच्या मागणीसाठी माजी आमदार केंद्रेंचा पोलीस ठाण्यात ठिय्या

पुढारी वृत्तसेवा

Political Clash Gangakhed

गंगाखेड : गंगाखेडमधील आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे आणि माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांच्यातील राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. शहरात झालेल्या वादातून मारहाण, शिवीगाळ आणि पिस्तूल रोखून जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अॅड. मिथिलेश मधुसूदन केंद्रे यांच्यासह चौघांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आमदार गुट्टे यांच्याविरोधातही माजी आमदार केंद्रे यांनी गंभीर तक्रार दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राजाभाऊ किशनराव कातकडे (वय ६२, रा. सुरळवाडी, गंगाखेड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १५ ऑक्टोबररोजी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. आरोपींनी संगनमत करून वाद घातल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. यावेळी आरोपी क्रमांक एक यांनी फिर्यादी आणि त्यांच्या मुलाच्या अंगावर पिस्तूल रोखून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच अन्य तिघांनी शिवीगाळ करून धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी अॅड. मिथिलेश मधुसूदन केंद्रे, सुभाष मुंडे, योगेश मुंडे आणि अजित शिवाजी घोबाळे (सर्व रा. गंगाखेड) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गंगाखेड पोलीस करीत आहेत.

दुसरीकडे, माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्याविरोधात जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ल्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी केंद्रे यांनी शनिवारी सकाळी नऊ वाजल्यापासून समर्थकांसह पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. दुपारी दोन वाजेपर्यंत आंदोलन सुरू होते. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनीही पोलीस ठाण्याला भेट दिली.

या वेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. दोन्ही बाजूंकडून करण्यात आलेल्या आरोपांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT