दैठणा शिवारात कार आणि ट्रकची भीषण धडक; अपघातात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. pudhari photo
परभणी

Parbhani Accident : परभणी-गंगाखेड महामार्गावर भीषण अपघात; एकजण गंभीर

अपघातात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

परभणी : तालुक्यातील दैठणा परिसरात परभणी-गंगाखेड महामार्गावर भीषण अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. अवघ्या एक दिवसापूर्वी एका दाम्पत्याचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच, शुक्रवारी (दि. 6) सकाळी 11 वाजेच्या सुमारास कार आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात कारचालक दीपक केशव शिंदे (वय 39, रा. सोलापूर) हे गंभीर जखमी झाले आहेत.

गंगाखेडहून परभणीकडे येणारी कार (एमएच 13 ईएस 5135) आणि परभणीहून गंगाखेडकडे जाणारा ट्रक (एमएच 27 सी 0798) यांच्यात दैठणा शिवारात समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर कार दोनवेळा गोल फिरून दुभाजकावर आदळली, तर ट्रक रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन धडकला. अपघातात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघातानंतर कारच्या गॅस टाकीतून गॅसचा वास येत होता, तर ट्रकच्या टँकमधून डिझेलची गळती सुरू झाली होती. यामुळे घटनास्थळी मोठा स्फोट किंवा आग लागण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, सुदैवाने पुढील अनर्थ टळला. स्थानिक ग्रामस्थ अक्षय कच्छवे, सुरज कच्छवे, हनुमान कच्छवे आणि इस्माईल इनामदार यांनी जीवाची पर्वा न करता जखमी शिंदे यांना कारमधून बाहेर काढले. त्यानंतर 108 रुग्णवाहिकेद्वारे त्यांना तातडीने परभणीतील रुग्णालयात हलवण्यात आले.

रस्ते सुरक्षा उपायांची मागणी

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली. दैठणा परिसरात वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी महामार्गावर गतिरोधक आणि सूचना फलक लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT