Gangakhed Lightning Strike Buffaloes Death
गंगाखेड : गंगाखेड तालुक्यातील गोपा येथे सोमवारी दि. २१ सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास अचानक वीज कडाडून शेतातील लिंबाच्या झाडावर कोसळली. या झाडाखाली बांधलेल्या दोन म्हशींना विजेचा जबर धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे शेतकरी भगवान मंचकराव कदम यांचे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही मनुष्य जीवितहानी झाली नाही.
गोपा येथील शेतकरी भगवान मंचकराव कदम यांचा शेत आखाडा गावालगतच्या शिवारात आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी आपल्या दोन म्हशी शेतातील लिंबाच्या झाडाला बांधल्या होत्या. सोमवारी सायंकाळच्या सुमारास परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर अचानक वीजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला.
याचदरम्यान लिंबाच्या झाडावर अचानक वीज कोसळली.वीज कोसळताच झाडाखाली बांधलेल्या दोन्ही म्हशींना विजेचा जोरदार धक्का बसला. यात दोन्ही म्हशींचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत दोन्ही म्हशी दगावल्या होत्या.
या घटनेत भगवान कदम यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. शेतीवर आणि पशुधनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यासाठी हा मोठा आर्थिक फटका आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून दोन्ही म्हशींचा पंचनामा करावा आणि नैसर्गिक आपत्तीच्या निकषानुसार शासनाकडून नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी भगवान कदम यांनी केली आहे.
दरम्यान, पावसाळ्यात वीजांचा कडकडाट होत असताना शेतकरी व नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा तसेच झाडाखाली किंवा उघड्या परिसरात थांबणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.