Parbhani Farmers Protest pudhari photo
परभणी

Parbhani Farmers Protest : शेतकरी प्रश्नावर धरणे आंदोलन

पीकविमा ट्रिगर, कर्जमाफीच्‍या अटी रद्द करण्याची मागणी; आंदोलनात शेतकर्‍यांची उपस्‍थिती

पुढारी वृत्तसेवा

परभणी : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शासन आणि प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही शेतकर्‍यांच्‍या ज्‍वलंत प्रश्नांकडे लक्ष न दिल्याने परभणीत शेतकऱ्यांनी एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन केले. येथील आंदोलन मैदानावर मंगळवार (दि.१६) जिल्हाभरातून शेतकरी एकवटले होते. कर्जमुक्‍तीच्‍या जाचक अटी रद्द करण्यात याव्‍यात, पीकविम्‍यासाठीच्‍या जाचक अटी रद्द करण्याची मागणी आंदोलनादरम्‍यान करण्यात आली.

आंदोलक शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे, २०२५पासून राज्य सरकारने पीकविमा योजनेतील जोखमीच्या बाबी वगळल्या आहेत. त्या तत्काळ सुरू कराव्या, पीकविमा योजनेतील उंबरठा उत्पादन निश्चित करण्यासाठी जोखीम स्तर १००% करावा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट संपूर्ण कर्जमाफी द्यावी, जिल्ह्यातील २०२५ मध्ये पात्र महसूल मंडळातील शेतकऱ्यांना तात्काळ पीकविमा नुकसान भरपाई द्यावी, पीकविमा योजनेसाठी केवळ पीककापणी प्रयोगाधारित उत्पादनावरच नुकसान भरपाई निश्चित करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

या निवेदनावर शेतकरी हेमचंद्र शिंदे, लव शेळके, किरण चक्रपानी, राजेंद्र जवळेकर, विश्वंभर गोरवे, मंगेश देशमुख, प्रताप शिंदे, बालाजी देवकते आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. संपूर्ण कर्जमुक्ती लागू करा, पीकविमा योजनेचे रद्द केलेले ट्रिगर लागू करा, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेल होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT