Parbhani News : झेडपी निवडणुकीत एकला चलो रे ची लढाई file photo
परभणी

Parbhani News : झेडपी निवडणुकीत एकला चलो रे ची लढाई

सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला; युती-आघाड्या अपयशाचा फटका कोणाला ?

पुढारी वृत्तसेवा

Parbhani District Council and Panchayat Samiti elections

परभणी, पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची व माघारी घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. यंदाच्या निवडणुकीत ना ठोस युती, ना प्रभावी आघाडी, अशी परिस्थिती असून जवळपास सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरती मर्यादित न राहता पक्षांची ताकद, नेतृत्वाची पकड आणि भविष्यातील राजकीय समीकरणांची चाचणी ठरणार आहे.

परभणी जिल्हा परिषदेच्या ५४ जागा आणि पंचायत समितीच्या १०८ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर अंतिम लढती निश्चित झाल्या आहेत. विशेष म्हणजे, ५४ पैकी ५४ जागांवर एकाही पक्षाला पूर्ण उमेदवारी देणे शक्य झालेले नाही, ही बाबच यंदाच्या निवडणुकीतील राजकीय तुकडाफळीचे द्योतक मानली जात आहे. भाजपने यंदा जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे ५० जागांवर उमेदवार उभे करत आपली ताकद दाखवली आहे.

पंचायत समितीच्या तब्बल १०२ जागांवर भाजप निवडणूक लढवत आहे. पालकमंत्री मेघना बोर्डीकर, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्यासह आ.डॉ. रत्नाकर गुट्टे, पक्षाचे स्थानिक नेते व पदाधिकारी मैदानात उतरले, भाजपने यंदा जिल्हा परिषद काबीज करण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावल्याचे चित्र आहे. शिव सेना (उवाठा) कडून खा. संजय जाधव हे जिल्हा परिषद निवडणुकीचे नेतृत्व करत आहेत. शिवसेनेने २० जागांवर थेट उमेदवार, तर पिंगळी आणि वालूर येथे पुरस्कृत उमेदवार दिले आहेत.

स्वबळावर लढत देत शिवसेना आपला पारंपरिक प्रभाव कायम राखण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष माजी आ. वावाजानी दुर्राणी, अनुसूचित जाती विभागाचे प्रदे शाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, माजी खा. तुकाराम रेंगे पाटील, माजी आ. सुरेश देशमुख यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची फळी मैदानात आहे. काँग्रेसने १८ जिल्हा परिषद व ३२ पंचायत समिती जागांवर उमेदवार दिले, काही ठिकाणी रासपसोबत आघाडी केली आहे. मात्र ही आघाडी जिल्हाभर प्रभाव टाकेल, अशी स्थिती दिसून येत नाही. शिंदे शिवसेनेने परभणी आणि जिंतूर विधानसभा मतदारसंघात भाजपसोबत केवळ दोन ठिकाणी युती केली आहे. संपर्कप्रमुख आनंद जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जात आहे. परभणी व जिंतूरमध्ये ५, गंगाखेडमध्ये ५, पाथरीमध्ये १६ जागांवर उमेदवार देत, एकूण २६ जागांवर शिंदे सेना निवडणुकीत आहे.

अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात आक्रमक भूमिकेत असून, जिल्हाध्यक्ष आ. राजेश विटेकर, माजी आ. विजय भांबळे यांच्यासह नेते प्रच ारात सक्रिय आहेत. राष्ट्रवादीने ४५ जिल्हा परिषद आणि ८८ पंचायत समिती जागांवर उमेदवार उतरवले. यामुळे राष्ट्रवादीही सत्ता स्पर्धेत महत्त्वाचा घटक ठरण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीने अनेक ठिकाणी उमेदवार देत आपली उपस्थिती नोंदवली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाने १२ जागांवर, तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांनीही निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. एकूणच, जिल्हा परिषद निवडणूक ही बहुपक्षीय, तुकडाफळीसह प्रतिष्ठेची लढाई ठरत असून, स्पष्ट युती आघाडी नसल्यामुळे निकाल अनिश्चित बनले आहेत. कोणता पक्ष सत्ता मिळवतो, की त्रिशंकू परिस्थिती निर्माण होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

राजकारणाला नवी दिशा मिळणार?

निवडणुकीतून केवळ जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीची सत्ता ठरणार नसून, जिल्ह्यातील नेतृत्वाची खरी ताकद, पक्ष संघटनांची खोली आणि मतदारांची मानसिकता याची चाचणी होणार आहे. भाजपने मोठ्या संख्येने उमेदवार देत आक्रमक भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे दोन्ही गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपापली पारंपरिक मते टिकवण्यात कितपत यशस्वी ठरतात, यावर सत्तेची गणिते अवलंबून राहणार आहेत. स्पष्ट युती-अभावी त्रिशंकू जिल्हा परिषद अस्तित्वात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत निकालानंतर नवीन राजकीय समीकरणे, संधीसाधू आघाड्या आणि सत्तेसाठी चालणाऱ्या वाटाघाटी हे चित्र दिसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरती मर्यादित न राहता, आगामी विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम ठरणार असून, परभणीच्या राजकारणाला नवी दिशा देणारा टर्निंग पॉइंट ठरेल, हे मात्र निश्चित मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT