चारठाणा : सध्या ऐन उन्हाळ्यात शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली असताना, चारठाणा येथील पेट्रोल पंपावर डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागत असूनही त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. दुसरीकडे, पंपावरील कर्मचारी मात्र 'तोंड पाहून' आणि जादा पैसे घेवून डिझेलचे वाटप करत असल्याचा खळबळजनक आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे. या प्रकारामुळे डिझेलची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र गावात पाहावयास मिळत आहे.
ट्रॅक्टर व इतर शेती उपकरणांसाठी डिझेल मिळेनासे झाल्याने शेतकरी दुचाकीवरून कॅन आणि कँडी घेऊन पंपावर चकरा मारत आहेत. खात्रीशीर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जे शेतकरी किंवा मध्यस्थ जास्तीचे पैसे देत आहेत, त्यांना थेट २००-२०० लीटर डिझेल दिले जात आहे. याच डिझेलची पुढे गावात १५० ते २०० रुपये प्रतिलीटर दराने बेकायदेशीर विक्री केली जात असल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांची मात्र पंपावर जाणूनबुजून थट्टा केली जात असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
"वेळेवर पाऊस पडण्यापूर्वी शेतीची मशागत पूर्ण होणे गरजेचे आहे. जर वेळेत डिझेल मिळाले नाही, तर खरीप हंगामाची पूर्वतयारी खोळंबेल आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल" असे मत एका त्रस्त स्थानिक शेतकऱ्यांने मांडले आहेत.
या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन संबंधित तेल कंपन्यांनी चारठाणा परिसरात डिझेलचा पुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे. तसेच, परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी तात्काळ लक्ष घालून डिझेलचा काळाबाजार रोखावा आणि शेतकऱ्यांना विनाविलंब डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशी आर्त हाक शेतकरी वर्गाकडून दिली जात आहे.