परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी १९ जुलै रोजी ८ जागा निवडून देण्यासाठी मतदान होत असून प्रस्थापित अगोदरच बिनविरोध निवडून आले असून कार्यकर्त्यांना मात्र निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी तब्बल १३ उमेदवार बिनविरोध निवडून आले. यामध्ये बँकेचे माजी चेअरमन माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर व त्यांच्या कन्या पालकमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर, भावना मुंगसे- बोर्डीकर या बिनविरोध निवडून आल्या. बँकेचे विद्यमान चेअरमन माजी आ. सुरेश वरपूडकर यांच्यासह त्यांच्या स्नुषा प्रेरणा वरपूडकर याही बिनविरोध निवडून आल्या.
हिंगोली जिल्ह्यातून राजेश पाटील गोरेगावकर व त्यांचे चिरंजीव दिग्विजय पाटील गोरेगावकर हे बिनविरोध निवडून आले. बँकेचे विद्यमान संचालक असलेले आ.राजेश विटेकर, माजी आ. सुरेश देशमुख, माजी संचालक भगवान वाघमारे हे बिनविरोध निवडून आले आहेत. एकंदरीत बँकेवर आजचागायत आलटून- पालटून सत्ता असणारी प्रस्थापित मंडळीनी बँकेत पुन्हा सहज प्रवेश मिळवला असून कार्यकर्त्यांना मात्र निवडणुकीसाठी सामोरे जावे लागणार आहेत.
एकंदरीत जिल्हा बँकेत प्रवेश करण्यासाठी कार्यकर्त्यांचा मार्ग मात्र खडतर असल्याचे दिसत आहे. बँकेचे माजी संचालक राहिलेल्या काही दिग्गजांनाही निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. १३ संचालक प्रारंभीच बिनविरोध निवडून आल्यामुळे व केवळ ८ जागांवर निवडणूक होणार असल्यामुळे निवडणुकीची रंगत संपल्याचे चित्र असून यामुळे अपेक्षित लक्ष्मी लाभ मिळणार नसल्यामुळे मतदारही हिरमुसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील पूर्णा सोसायटी मतदारसंघातून निवडणूक होत आहे.
मानवत तालुका सोसायटी मतदार संघातून बँकेचे माजी उपाध्यक्ष पंडितराव चोखट यांचे चिरंजीव आकाश चोखट आणि आ. राजेश विटेकर यांचे समर्थक अमोल कदम यांच्यात सरळ लढत होणार आहे. हिंगोली तालुका सोसायटी मतदारसंघातून आ. तानाजी मुटकुळे व माजी आ. गजानन घुगे यांनी माघार घेतली असली तरी कार्यकर्त्यांत लढत होत आहे. वसमत तालुका सोसायटी मतदारसंघातून आ. चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांना निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. इतर शेती संस्था मतदारसंघांत तब्बल २५ उमेदवारांना निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
यामध्ये आ. सईद खान यांच्यासह भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, समशेर वरपूडकर, विजय जामकर, शशिकांत वडकुते, अजित वरपूडकर यांचा समावेश आहे. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातही निवडणूक होणार असून येथे बँकेचे माजी संचालक अतुल सरोदे, शोभा बोबडे, माजी संचालक द्वारकाबाई कांबळे, संजय सारणीकर, प्रशास ठाकूर, शिवाजी मव्हाळे असे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघातही निवडणूक होत असून येथे बँकेचे माजी संचालक स्वराजसिंह परिहार, दत्ता मायंदळे हे उमेदवार रिंगणात आहेत. एकंदरीत जिल्ह्याच्या राजकारणावर पगडा असणारी प्रस्थापित मंडळी जिल्हा बँकेत बिनविरोध पोचली असली तरी, कार्यकर्त्यांना मात्र निवडणुकीला सामोरे जात लढावे लागणार आहे.